राहुल गांधींचा घणाघात; मध्यरात्रीच्या सोहळ्याची ‘स्वत:च्या उदोउदोचा तमाशा’ म्हणून संभावना

वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी ही खरोखर मूलभूत आर्थिक सुधारणा आहे; पण नरेंद्र मोदी सरकारने त्याचा फक्त तमाशा लावलाय. मोदी सरकारच्या अकार्यक्षम व असंवेदनशील अंमलबजावणीने जीएसटीची गत नोटाबंदीसारखीच होईल, अशी भविष्यवाणी करीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी मोदी यांच्यावर हल्लाबोल चढविला.

इटलीमधून अजूनही मायदेशी न परतलेल्या राहुल यांनी एकापाठोपाठ केलेल्या ट्वीट्समधून संसदेच्या सेंट्रल हॉलमधील सोहळ्याची संभावना ‘स्वत:च्या उदोउदोचा तमाशा’ अशी केली. ‘‘जीएसटी हा काही नोटाबंदीसारखा (तुघलकी) प्रकार नाही. ती खरोखर आर्थिक सुधारणा आहे. म्हणून तर त्याची संकल्पना काँग्रेसने मांडली आणि त्यास पहिल्यापासून पाठिंबा दिला; पण मोदी सरकारने ज्या अर्धवट पद्धतीने त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे, त्यामध्ये स्वत:चा उदोउदो करण्यापलीकडे काही नाही. पुरेशी तयारी नसताना, संबंधित वित्तीय संस्थांमध्ये पायाभूत सुविधा नसताना, जीएसटीच्या अंमलबजावणीने कोटय़वधी सामान्य नागरिक, लक्षावधी व्यापारी व छोटे उद्योजक यांच्यामध्ये अस्थिरतेचे वातावरण आहे. त्यांना वेदना होतील,’’ असे राहुल गांधी आक्रमकपणे म्हणाले. तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष व द्रमुकला साथ देऊन काँग्रेसने या सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे.

दुसरीकडे काँग्रेसने गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी जीएसटीबाबत केलेल्या विधानाची क्लिप पुनर्प्रकाशित केली. त्यामध्ये जीएसटी कदापि यशस्वी होणार नसल्याची टिप्पणी करताना मोदी दिसत आहेत. तसेच पुरेशा पायाभूत सुविधा नसताना जीएसटीची अंमलबजावणी अशक्य असल्याची कोटीही त्यांनी तेव्हा केली होती. त्याची आठवण देऊन ज्येष्ठ नेते कॅ. आनंद शर्मा म्हणाले, ‘‘जीएसटीबद्दल मोदींना काय वाटते, हे यातून दिसते. मोदीजी, तुम्ही तुमचे शब्द इतक्या लवकर कसे विसरलात? पुरेशी तयारी नसताना अंमलबजावणी का करीत आहात?’’

जीएसटी आपलेच अपत्य आहे, असे काँग्रेस सातत्याने म्हणते, तर मग हे अपत्य का कबूल करीत नाही? काँग्रेसने दुराग्रह सोडला पाहिजे. या ऐतिहासिक करसुधारणेवर बहिष्कार टाकण्याचा वेडेपणा करू नये.

– प्रकाश जावडेकर, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री