News Flash

“मोदीजी तो गुलाबी चष्मा काढा, ज्यामधून सेंट्रल व्हिस्टाशिवाय काहीच दिसत नाही”

बिहारमधील बक्सममध्ये गंगेच्या किनारी मृतदेह वाहून आल्यानंतर नरेंद्र मोदींवर विरोधकांची टीका

देशात करोनाचा कहर सुरूचं आहे. करोनामुळे मृत्यूदर देखील वाढत आहे. देशात ऑक्सिजन, औषधे आणि रुग्णालयात बेडची देखील कमतरता आहे. मात्र देशात करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंतिम संस्कार करण्यासाठी जागा मिळत नाहीये. बिहार, उत्तर प्रदेश मधून धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. बिहारमधील बक्सममध्ये गंगेच्या किनारी मृतदेह वाहून आले आहेत. प्रशासनाने हे मृतदेह उत्तर प्रदेश येथून वाहून आले असल्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, या घटनेवरून कॉंग्रेल नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

राहुल गांधी म्हणाले, “नदीत वाहून येणारे मृतदेह आणि रुग्णालयातील परिस्थितीने जीवन सुरक्षेचा हक्क हिसकावला आहे, पंतप्रधान मोदीजी तो गुलाबी चष्मा काढा, ज्यामधून सेंट्रल व्हिस्टाशिवाय काहीच दिसत नाही’

राष्ट्रवादीचे नेते, महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देखील केली टीका

रामराज्याचे स्वप्न दाखविणाऱ्यांनी देशाला रामभरोसे सोडले, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केली. आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेज प्रताप यादव यांचे ट्विट रीट्विट करत नवाब मलिक यांनी टीका केली आहे.

काय आहे प्रकरण

बिहारमधील चौशा शहरात सकाळी जेव्हा गावकरी नदी किनाऱ्यावर गावकरी पोहोचले. तेव्हा तेथील चित्र पाहून त्यांना धक्काच बसला. गंगेच्या किनारी मृतदेह वाहून येत होते. गावकऱ्यांनी तात्काळ प्रशासनाला यासंबंधी माहिती दिली. हे मृतदेह करोना रूग्णाचे असल्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. प्रशासनाने हे मृतदेह उत्तर प्रदेश येथून वाहून आले असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

“४० ते ४५ मृतदेह पाण्यात तरंगत होते,” अशी माहिती चौशा जिल्ह्याचे अधिकारी अशोक कुमार यांनी दिली आहे. अशोक कुमार यावेळी घटनास्थळी महादेव घाट येथे उभे राहून बोलत होते. हे मृतदेह पाण्यात फेकून दिले असावेत, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. मृतदेहांची संख्या १०० पर्यंत जाऊ शकते, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.

“हे मृतदेह गेल्या पाच ते सात दिवसांपासून पाण्यात असल्याने फुगले आहेत. आम्ही त्यांची विल्हेवाट लावत आहोत. हे मृतदेह उत्तर प्रदेशातील बहारिच, वाराणसी किंवा अलाहाबाद यापैकी कोणत्या शहरातील आहेत याचा तपास करणार आहोत,” अशी माहिती के के उपाध्याय या अधिकाऱ्याने दिली आहे. “हे मृतदेह येथील नाहीत, कारण आमच्याकडे मृतदेह पाण्यात सोडण्याची परंपरा नाही,” असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान या मृतदेहांमुळे पाण्यातून संसर्ग फैलावण्याची भीती सध्या शहरात आहे. मृतदेहांचा खच लागला असून अनेक श्वानदेखील त्याठिकाणी दिसत होते. यामुळे स्थानिकांच्या मनात खूप भीती आहे. करोनाची लागण होण्याची भीती असून गावकऱ्यांनी हे मृतदेह दफन करण्याची मागणी केली आहे.


सेंट्रल व्हिस्टा रीडेव्हलपमेंट प्रकल्पाचा अत्यावश्यक सेवेत समावेश 

केंद्र सरकारने दिल्लीमध्ये नव्या संसद भवनाच्या सेंट्रल व्हिस्टा रीडेव्हलपमेंट प्रकल्पाचा समावेश अत्यावश्यक सेवेत केला आहे. त्यामुळेच दिल्लीमधील लॉकडाउन आणि निर्बंधांच्या कालावधीमध्येही सेंट्रल व्हिस्टाचे बांधकाम सुरु राहणार आहे. यावरुनच काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधाला आहे. काँग्रेसने या प्रकल्पाचा अत्यावश्यक सेवेत समावेश करुन घेण्याच्या मुद्द्याचा संबंध देशातील सद्यपरिस्थितीशी जोडला आहे. देशातील लोकांना श्वास घ्यायला त्रास होत असताना पंतप्रधान मोदींच्या संवेदना संपल्यात का?, असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केलाय. सेंट्रल व्हिस्टा हा मोदी सरकारच्या ड्रीम प्रोजेक्ट्सपैकी एक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2021 12:34 pm

Web Title: rahul gandhi criticizes narendra modi over dead bodies in bihar srk 94
Next Stories
1 मोदी सरकारवर टीका केल्याने जे पी नड्डा संतापले; सोनिया गांधींना पत्र लिहून दिलं उत्तर
2 सिरमला मोदी सरकारचा दणका! ५० लाख लसी युकेला पाठवण्याचा प्रस्ताव फेटाळला
3 Covid 19: बनावट रेमडेसिविरची विक्री करणारं रॅकेट उद्ध्वस्त; विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याला अटक
Just Now!
X