नरेंद्र मोदी देशातील जनतेला भेटायला आणि संवाद साधायला तयार नसतील, तर त्यांच्या पंतप्रधानपदाला काय अर्थ आहे, अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. ते सोमवारी लखनऊ येथील किसान यात्रेदरम्यान बोलत होते. यावेळी राहुल यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी, उत्तरप्रदेशातील परिस्थिती आणि काश्मीर मुद्द्यावरून मोदी सरकारला लक्ष्य केले. पंतप्रधान मोदी देशातील लोकांना  भेटायला तयार नसतील, त्यांच्या घामास स्पर्श करण्यास तयार नसतील, त्यांना जवळ करण्यास तयार नसतील, तर त्यांच्या पंतप्रधानपदाला काय अर्थ आहे, असा सवाल यावेळी राहुल यांनी उपस्थित केला. मोदीजी शेतकऱ्यांशी इंटरनेटच्या माध्यमातून संवाद साधण्याची भाषा करतात. मात्र, अशावेळी मोदी आणि शेतकऱ्यांमध्ये कित्येक मैलांचे अंतर असते. आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले, हे काँग्रेस गर्वाने आणि जाहीरपणे सांगू शकते. मात्र, मोदींना उद्योगपतींचे कर्जमाफ केल्याची कबुली हळूच द्यावी लागते, असा टोला राहुल यांनी लगावला.
उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आयोजित करण्यात आलेल्या किसान यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यास आजपासून प्रारंभ झाला. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर गांधी यांनी पुन्हा एकदा या यात्रेस सुरुवात केली. यात्रेचा पहिला टप्पा नुकताच संपला असून, त्यामध्ये गांधी यांनी १७ खाट सभा व १२ रोड शो घेत जनतेच्या व्यथा समजून घेतल्या. दरम्यान, आजच्या सभेत राहुल यांनी मोदी उत्तर प्रदेशमधील नेत्यांवर दबाव आणत असल्याचाही आरोप केला. बहुजन समाज पक्षाच्या (बसप) नेत्या मायावती व समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यांचा ‘रिमोट’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती आहे. मायावती व मुलायम यांच्याविरोधात गैरव्यवहाराचे आरोप आहेत. या दोन्ही नेत्यांना केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) भय आहे.  ते संसदेमध्ये काही बोलण्यासाठी उभे राहिले; की मोदीजी त्यांच्याकडे पाहतात व ते खाली बसतात, असे राहुल यांनी सांगितले.