‘समांतर व्यवहारामुळे राफेल विमाने मिळण्यास विलंब’

राहुल गांधी यांची मागणी

नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेलच्या मुद्दय़ावरून गुरुवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढविला. या विमान खरेदी कराराबाबतच्या अधिकृत कागदपत्रांची चोरी झाली त्याचा तपास सुरू करण्यात आला असताना ३० हजार कोटी रुपयांच्या या गैरव्यवहारप्रकरणी मोदी यांची चौकशी करण्याचे आदेश का दिले जाऊ शकत नाहीत, असा सवालही राहुल गांधी यांनी गुरुवारी केला.

राफेल करार करताना पंतप्रधान मोदी यांनी प्रचलित पद्धतीला बगल दिली. इतकेच नव्हे तर मोदी यांच्या बचावासाठी सरकारने संस्थांवरही दबाव आणल्याचा आरोप राहुल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. सर्वासाठी न्याय समान असला पाहिजे, प्रत्येकाची चौकशी करा आणि विमान खरेदी कराराबाबत पंतप्रधान कार्यालय समांतर चर्चा करीत असल्याचे उघड झाल्याने मोदी यांचीही चौकशी केली पाहिजे, अशी मागणी राहुल यांनी केली.

पंतप्रधान कार्यालयाने समांतर चर्चा सुरू केल्याने राफेलची विमाने मिळण्यास विलंब झाला. उद्योगपती अनिल अंबानी यांना ३० हजार कोटी रुपये द्यावयाचे असल्याने विमाने लवकर मिळाली नाही, असा आरोपही राहुल यांनी केला. संरक्षण मंत्रालयातून राफेलबाबतच्या फाइल्स चोरीला गेल्याचे अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले, त्यावरूनही राहुल यांनी सरकारवर टीका केली.

‘गायब हो गया’ ही मोदी सरकारची नवी टॅगलाइन आहे. युवकांचे रोजगार, शेतमालाला योग्य भाव, प्रत्येकाच्या बँक खात्यामध्ये १५ लाख रुपये जमा करणे, शेतकऱ्यांचा विमा, काळा पैसा आणि डोकलाम याप्रमाणे राफेलच्या फाइलीही गायब झाल्या आहेत. सरकारने माध्यमांची चौकशी करण्यात येईल, असे सांगितले, मात्र ३० हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारांमध्ये सामील असलेल्यांची चौकशी मात्र नाही, ही बाब अजब आहे. सरकार कोणत्याही स्थितीत ‘चौकीदाराला’ संरक्षण देत आहे, असेही राहुल म्हणाले.

मोदीच पाकिस्तानचे ‘पोस्टरबॉय’!

काँग्रेस पक्ष पाकिस्तानचा ‘पोस्टर बॉय’ असल्याची टीका भाजपने केली त्यावरूनही राहुल यांनी मोदींवर टीका केली. पठाणकोट दहशतवादी हल्ल्याची चौकशी करण्यासाठी मोदी सरकारने पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ला भारतात निमंत्रित केले. त्यांनीच पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना आपल्या शपथविधीसाठी निमंत्रित केले, त्यामुळे आम्ही नव्हे तर तुम्हीच पाकिस्तानचे ‘पोस्टर बॉय’ आहात, असा टोलाही राहुल यांनी लगावला.

राहुल यांना पाकिस्तानकडून प्रमाणपत्र हवे आहे का?

रविशंकर प्रसाद यांचा सवाल

नवी दिल्ली : राफेल विमाने खरेदी व्यवहाराबाबत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी धादांत खोटे बोलत आहेत. भारतीय हवाई दलावर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर त्यांचा विश्वास नाही, त्यांना राफेलबद्दल पाकिस्तानकडून प्रमाणपत्र हवे आहे का, असा सवाल भाजपने गुरुवारी केला आणि गांधी यांच्यावर प्रतिहल्ला चढविला. राहुल यांनी राफेलप्रकरणी मोदी यांच्या चौकशीची मागणी करताच केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी त्यांच्यावर प्रतिहल्ला चढविला. भारतीय नेते आणि भारतीय दलांपेक्षा गांधी यांचा पाकिस्तानवर अधिक विश्वास आहे, अशी टीका प्रसाद यांनी केली. राहुल गांधी यांच्या धादांत खोटेपणाचा आपण निषेध करतो, राफेलच्या व्यवहारात अयोग्य प्रकार घडलेला नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे, कॅगवरही राहुल यांचा विश्वास नाही. त्यांना राफेलबाबत पाकिस्तानकडून प्रमाणपत्र हवे आहे का? परंतु याबाबत आम्ही त्यांची कोणतीही मदत करू शकत नाही, असा टोला प्रसाद यांनी लगावला.