गुजरात विधानसभा निवडणुकीतील भाजपचे प्रभारी व केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी काँग्रेस व राहुल गांधी यांच्यावर घणाघाती हल्ला केला. विकासाची थट्टा करत काँग्रेसने ‘विचित्र अभियान’ सुरू केले असून त्यांच्याकडून जातीयवादाचे विष पसरवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. राहुल गांधी यांना जीएसटीबाबत काहीच माहिती नसल्याची आता मला खात्री झाली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून जीएसटीवरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला चांगलेच घेरले आहे. त्यामुळे पत्रकार परिषदेत जेटली यांचा रोख राहुल गांधी यांच्याकडेच होता.

गुजरातमध्ये मागील तीन निवडणुकांदरम्यान काँग्रेसने एकाच (नरेंद्र मोदी) व्यक्तीला लक्ष्य केले होते. त्यांनी २००७ आणि २०१२ मधील निवडणुकीवेळी सर्व यंत्रणांचा वापर केला. सीबीआयचा दुरूपयोग केला, दहशतवाद्यांच्या रूपात देशविरोधी घटकांचा वापर केला. यावेळी मला जरा विचित्र स्थिती असल्याचे भासत आहे. असं पहिल्यांदाच झालं आहे की, केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जगात एक राजकीय पक्ष विकासाला वाईटरितीने सादर करण्याचे अभियान सुरू करत आहे, असे ते म्हणाले.

काँग्रेसकडून चालवण्यात येत असलेल्या ‘विकास वेडा झालाय’ अभियानाकडे लक्ष वेधत ते म्हणाले, विकास गरिबीशी लढतो, तो मागासलेपणाविरोधात लढतोय पण ते याचीच खिल्ली उडवत आहेत, असेही त्यांनी म्हटले.

हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी आणि अल्पेश ठाकोरसारखे जनाधार असणाऱ्या नेत्यांना आपल्या बाजूने आणण्यासाठी काँग्रेसकडून केला जात असलेल्या प्रयत्नांवर टीका करताना ते म्हणाले की, जेव्हा कोणती कल्पना काम करत नाही, तेव्हा तुम्ही विकासाचे राजकारण थोपवण्यासाठी जातीयवादाचे विष पसरवता. देशातील ज्या राज्यांत जातीयवादाचे विष पसरवण्यात आले आहे, ती राज्ये विकासात अजूनही मागासलेली असल्याचे त्यांनी सांगितले.