लोकसभा निवडणुकीतील प्रचंड पराभवानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहण्यास नकार देणारे राहुल गांधी प्रसिद्धीमाध्यमांपासून व लोकांपासून लांब राहू इच्छित आहेत. परंतु याचा अर्थ असा नाही की ते घरात बसून आहेत. सध्या प्रचंड व्हायरल झालेल्या एका पोस्टनुसार आपला कुत्रा पिडी याला गाडीतून फिरवताना व त्याच्याबरोबर वेळ व्यतित करताना राहुल दिसत आहेत.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर राहुल गांधींनी कॅमेऱ्यापासून व प्रसारमाध्यमांपासून तसेच समाजमाध्यमांपासून लांब राहणं पसंत केलं. परंतु त्यांनी आपल्या कुत्र्याला कारमधून फिरायला नेतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. अनेक ट्विटरकरांनी पिडीच्या दर्शनावर आनंद व्यक्त केलाय तर अनेकांनी यावरूनही राहुलना ट्रोल केलं आहे. दिल्लीमध्ये तुघलक लेनवर राहुल कार चालवताना व मागच्या सीटवर पिडी हा त्यांचा कुत्रा बसलेला दिसत आहेत.