काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी दोन दिवसीय जम्मू दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांना त्रिकुटा नगर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘जय माता दी’ने केली. ते इतक्यावर थांबले नाहीत तर उपस्थित कार्यकर्त्यांकडूनही त्यांनी ‘जय माता दी’चा जयघोष करून घेतला. “मी वैष्णो देवीचं दर्शन घेतलं. मला असं वाटतंय की माझ्या घरी आलो आहे.” असं त्यांनी भाषणादरम्यान सांगितलं.

“काल मी मंदिरात गेलो होतो. तिथे लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा देवी होती. दुर्गा या शब्दाचा अर्थ आहे रक्षण, लक्ष्मीचा अर्थ आहे लक्ष्य पूर्ण करा आणि सरस्वतीचा अर्थ आहे आम्हाला विद्या द्या. या तीन शक्तिंमुळे देशाचा विकास होतो.” असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. “नोटबंदी, जीएसटीमुळे लक्ष्मी घटली. नव्या कृषि कायद्यांमुळे दुर्गा शक्ती कमी झाली आणि विद्यालयात संघाची लोकं बसवून सरस्वतीची शक्ती कमी झाली. जे लोक स्वताला मोठे हिंदू समजतात, त्यांनी दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वतीचा अपमान केला आहे. ही लोकं देवीच्या मंदिरात डोकं टेकतात आणि त्यांची शक्ती कमी करण्याचा काम करतात”, असं बोलत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

काँग्रेस नेते राहुल गांधी हे दोन दिवसीय जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. गुरुवारी (९ सप्टेंबर) ते पायी चालत वैष्णोदेवी मंदिरात पोहोचले. खरंतर गेल्या अनेक वर्षांपासून राहुल गांधी यांना वैष्णोदेवीला यायचं होतं. मात्र, राजकीय परिस्थितीमुळे ते हा दौरा करु शकत नव्हते असं काँग्रेसचे जम्मू काश्मीरमधील प्रदेशाध्यक्ष गुलाम अहमद मीर यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, आता आपल्या या २ दिवसांच्या दौऱ्यात राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “मी काश्मिरी पंडित आहे. माझं कुटुंब काश्मिरी पंडित आहे. म्हणूनच मी जेव्हा जम्मू -काश्मीरला येतो तेव्हा मला असं वाटतं की मी घरीच आलो आहे”, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.

माझ्या काश्मिरी पंडित बांधवांना मी वचन देतो की…!

“आज सकाळी काश्मिरी पंडितांचं शिष्टमंडळ मला भेटले. त्यांनी मला सांगितलं की काँग्रेसने त्यांच्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या. पण भाजपाने काहीच केलं नाही. पण मी माझ्या काश्मिरी पंडित बांधवांना वचन देतो की, मी त्यांच्यासाठी नक्कीच काहीतरी करेन”, असं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं आहे. ते म्हणाले, “माझ्या हृदयात जम्मू -काश्मीरला विशेष स्थान आहे. पण मला वेदनाही होतात. जम्मू -काश्मीरमध्ये बंधुभाव आहे. पण भाजप आणि आरएसएस ते बंधन तोडण्याचं प्रयत्न करत आहेत”, असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपावर घणाघाती टीका केली.