आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेससोबत युती करण्यास नकार देणाऱ्या बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती 2019 लोकसभा निवडणुकीत नक्कीच काँग्रेससोबत हात मिळवतील असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. दोन्ही पक्ष एकत्र 2019 लोकसभा निवडणूक लढतील असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

हिंदुस्तान टाइम्सच्या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी मायावती यांच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली. मायावती यांनी काही झालं तरी काँग्रेससोबत युती करणार नाही असं म्हटलं आहे. यावर बोलताना राहुल गांधींनी सांगितलं की, ‘बसपासोबत युती न झाल्याने राजस्थान आणि मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जास्त फरक पडणार नाही’.

‘राज्यातील युती आणि केंद्रातील युती यामध्ये फरक असून मायावती यांनीही तसं सूचित केलं आहे. बसपा काँग्रेससोबत हात मिळवत नसल्याने काँग्रेसला जास्त फरक पडत असल्याचं जाणवत नाही’, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

युती करण्यात काँग्रेस पक्षातील काही नेते अडथळा आणत असल्याच्या मायावती यांच्या म्हणण्यावर बोलताना राहुल गांधी यांनी सांगितलं की, ‘आम्ही जागावाटपावर चर्चा करण्यास नेहमी तयार आहोत. चर्चेसाठी मी नेहमीच उपलब्ध असतो. आम्ही चर्चा स्तरावर असतानाच बसपाने आपला वेगळा मार्ग निवडला आहे’. मात्र राष्ट्रीय निवडणुकीत बसपा आणि काँग्रेस नक्की एकत्र येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

काही झालं तरी काँग्रेससोबत युती करणार नाही – मायावती
काही झालं तरी काँग्रेससोबत युती करणार नाही असं मायावती यांनी जाहीर केलं आहे. काँग्रेसवर हल्लाबोल करताना मायावती यांनी म्हटलं होतं की, ‘मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षासोबत युती करणार नाही’. ‘राजस्थान आणि मध्य प्रदेशात दोन्हीकडे आम्ही एकतर प्रादेशिक पक्षांसोबत युती करु अन्यथा स्वतंत्र लढू. पण काँग्रेससोबत जाणार नाही’, असं मायावती पत्रकार परिषदेदरम्यान बोलल्या.