काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी (दि.२६) विमानाने दिल्लीहून कर्नाटकच्या हुबळी येथे जाताना थोडक्यात बचावले. उड्डाण घेतल्यानंतर विमानात बिघाड असल्याचं लक्षात आलं त्यानंतर गोंधळ उडाला. दरम्यान, या घटनेत राहुल गांधी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. मात्र, राहुल यांच्या विमानात उद्भवलेल्या संशयास्पद तांत्रिक बिघाडांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणी संबंधित वैमानिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विमानातूनच प्रवास करणारे कौशल विद्यार्थी यांनी कर्नाटकचे पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. दुसरीकडे, काँग्रेसनेही याबाबत कर्नाटक पोलिसांकडे आणि नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाकडे (डीजीसीए) तक्रार केली असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  विमानाने राहुल यांच्यासह अन्य चारजण प्रवास करत होते. विमानाने सकाळी ९ वाजून २० मिनिटांच्या सुमारास दिल्लीहून हुबळीसाठी उड्डाण घेतलं. ११ वाजून ४५ मिनिटांनी विमान हुबळीत पोहोचणार होतं. मात्र, पावणे अकराच्या सुमारास आकाशात असतानाच विमान हेलकावे खायला लागलं, विमान एका बाजूला झुकले आणि खाली आले.  विमानाच्या एका भागातून विचित्र आवाज येत होता. याशिवाय विमानातील ‘ऑटोपायलट मोड’ काम करत नव्हतं. हवामान सामान्य असतानाही असा प्रकार घडल्याने सगळेच चक्रावून गेले.  हुबळी विमानतळावर विमान उतरवण्यासाठी तीन वेळेस प्रयत्न करण्यात आला, तिस-या प्रयत्नात विमान उतरवण्यात यश आलं. राहुल यांच्यासह विमानात प्रवास करणा-या प्रवाशांपैकी एक कौशल विद्यार्थी यांनी कर्नाटक पोलिसांनी लिहिलेल्या तक्रारपत्रातून ही माहिती समोर आली आहे. या प्रवासादरम्यान अनेक अनपेक्षित आणि संशयास्पद प्रकार घडले’, असे कौशल यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. हा सगळाच प्रकार संशयास्पद होता, असे कौशल यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार , काँग्रेसने याबाबत नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाकडे तक्रार केली असून तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. सदर विमान ताब्यात घेऊन वैमानिकाची हुबळीमध्ये चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.