केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्या धर्माबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. राहुल गांधी यांचे वडील मुस्लीम असून आई खिश्चन आहे. मग ते हिंदू ब्राह्मण कसे?, ब्राह्मण असल्याचे पुरावे ते देऊ शकतात का?, असा सवाल केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी विचारला आहे.

कर्नाटकमधील उत्तर कन्नड येथील सिरसी या गावात 9 मार्च रोजी हेगडे यांनी सभा घेतली. या सभेत त्यांनी हवाई हल्ल्यांबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर टीका केली. पाकिस्तानमधील हवाई हल्ल्यांचे त्यांना पुरावे हवे आहेत. आता मुस्लीम व्यक्तीचा मुलगा तो ब्राह्मण असल्याचा पुरावा देऊ शकतो ?, मूळात राहुल गांधी ब्राह्मण कसे काय ?, त्यांचे वडील मुस्लीम असून आई ख्रिश्चन आहे. मग ते ब्राह्मण कसे, ते यासंदर्भातील काही पुरावे देऊ शकतात का?, असा प्रश्न त्यांनी विचारला.

हेगडे पुढे म्हणाले, मी तुम्हाला हे विनोद म्हणून सांगत नाही. याची कागदोपत्री नोंद आहे. राजीव गांधी यांच्या शरीराचे बॉम्बस्फोटात तुकडे झाले होते. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी गांधी कुटुंबातील एका व्यक्तीचे डीएनए नमुने लागणार होते. त्यावेळी सोनिया गांधी यांनी राहुल गांधी यांच्या चाचणीस नकार दिला आणि प्रियंका गांधी यांना चाचणीसाठी पाठवले, असा दावा देखील हेगडे यांनी केला.