भाजप देशात हिंसा पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. ते देशाला तोडण्याचा प्रयत्न करतात, पण आम्ही सर्वांना जोडतो, ते आग लावतात, आम्ही विझवतो, अशा शब्दात काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला. आपण एकतेचे आणि प्रेमाचे राजकारण करु, अशी ग्वाही त्यांनी दिली.

शनिवारी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतरच्या पहिल्याच भाषणात राहुल गांधींनी भाजपवर टीकेची तोफ डागली. भविष्यातील त्यांच्या वाटचालीची झलकच यातून पाहायला मिळाली. सोनिया गांधी यांच्या भाषणाच्या अगोदर उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी सुरु केली. राहुल गांधी भाषणाला उभे राहिल्यावर फटाक्यांचा आवाज येतच होता. त्याकडे लक्ष वेधत राहुल गांधी म्हणाले, एकदा आग लावली ती ती विझवणे कठीण असते याचे हे उत्तम उदाहरण आहे. मी भाजपच्या लोकांनाही हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. भाजप संपूर्ण देशात हिंसेची आग पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. ते आग लावतात, आम्ही विझवतो, ते तोडतात आणि आम्ही जोडतो, ते रागावतात आणि आम्ही प्रेम करतो, असे सांगत त्यांनी भाजप आणि काँग्रेसच्या विचारधारेतील फरक नमूद केला. त्यांना रोखण्याची क्षमता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्येच आहे, असेही त्यांनी सांगितले.

आगामी काळात काँग्रेस देशातील सर्वात जुना आणि तरुण पक्ष असेल असे आश्वासन मी तरुणांना देतो. आपण सर्वांनी एकत्र येऊन एकता आणि प्रेमाची भावना असलेला देश घडवूया, असे सांगत राहुल गांधींनी देशातील तरुणांना साद घातली. द्वेषाच्या राजकारणावर प्रेमानेच मात करुया, असे त्यांनी नमूद केले. देशात आधी जनतेच्या हितासाठी राजकारण केले जायचे, पण सध्या लोकांचा आवाज दाबण्यासाठी राजकारण केले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. भाजपशी आमचे वैचारिक मतभेद आहेत, मात्र त्यानंतरही आम्ही भाजपच्या लोकांचा आदर करतो. मात्र त्यांना काँग्रेस मुक्त भारत घडवायचा आहे, काँग्रेसचे राजकारण सर्वसमावेशक असल्याचा दावा त्यांनी केला. सोनिया गांधी, मनमोहन सिंग आणि अन्य ज्येष्ठ नेत्यांच्या सावलीत मी वाटचाल करत राहणार, असेही ते म्हणालेत. काँग्रेसने देशाला पुढे नेण्याचे काम केले. मात्र, विद्यमान पंतप्रधान देशाला मागे नेत आहेत, असा आरोप त्यांनी केला.