काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना सोमवारी एका निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून, काँग्रेस नेते याप्रकरणासंबंधी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेणार असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल यांना तमीळ भाषेमधून चिठ्ठी पाठविण्यात आली असून, यामध्ये जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे राहुल यांना आलेल्या या धमकीच्या चिठ्ठीवरून त्यांची सुरक्षा आणखी वाढविण्यात येणार असल्याचे समजते. राहुल गांधी मंगळवारी कारिकल येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेवेळी उपस्थित राहणार आहेत. पदुच्चेरीमधील कारखाने बंद पडण्यास यूपीए सरकारमधील मंत्री जबाबदार असून, राहुल गांधी यांना कारिकल येथील भाषणादरम्यान बॉम्बने उडविण्यात येईल, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, राहुल गांधींना देण्यात आलेल्या या धमकी पत्रावरून काँग्रेस नेते गृहमंत्री राजनाथसिंह यांची आज दुपारी भेट घेणार असून, राहुल यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याची मागणी ते करणार आहेत.