काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज मैसूर येथील महाराणी आर्ट्स कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत होते. तेवढ्यात एका मुलीने त्यांना विनंती करत मला तुमच्यासोबत सेल्फी घ्यायचा आहे असे म्हटले. राहुल गांधी यांनी या मुलीची विनंती मान्य करत विद्यार्थ्यांसोबत आपला संवाद थांबवून स्टेज सोडले आणि या मुलींसोबत त्यांनी सेल्फी काढले. राहुल गांधी यांची ही कृती सगळ्यांनाच आवडली. त्यानंतर अनेकांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढले.

सेल्फी काढल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यास सुरुवात केली. आपल्या भाषणात त्यांनी जीएसटीच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे झालेले नुकसान, नोटाबंदी या विषयांवर भाष्य केले. तसेच मोदी सरकारने रोजगार निर्मितीच्या संधीच निर्माण केल्या नसल्याचीही टीका त्यांनी केली. मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय ही सर्वात मोठी चूक होती अशी टीका राहुल गांधी यांनी केली. तसेच जीएसटीच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे अर्थव्यवस्था ढासळली आणि रोजगाराच्या संधी कमी झाल्या किंवा निर्माण होणेच थांबले असाही आरोप त्यांनी केला.

या विषयानंतर त्यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्याबाबतही भाष्य केले. नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेला २२ हजार कोटींचा चुना लावल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. एवढ्या मोठ्या रकमेचे कर्ज जर महिला बचत गट किंवा लघू आणि मध्यम दर्जाच्या व्यावसायिकांना दिले असते तर त्यांनी देशाच्या प्रगतीत हातभार लावला असता. मात्र नीरव मोदीने बँकेला चुना लावून पलायन केले अशी टीका राहुल गांधी यांनी केली.