गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष निवडीवर सोमवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. राहुल गांधी यांची पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. येत्या १६ तारखेला राहुल दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात त्यांची आई सोनिया गांधी यांच्याकडून अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारतील. ४ डिसेंबरला राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, राहुल यांच्याविरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नव्हता. उमेदवारी अर्ज दाखल मागे घेण्याची आजची शेवटची तारीख होती. परंतु, राहुल यांना अध्यक्षपदासाठी कोणीही आवाहन न दिल्यामुळे त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

सोनिया गांधी या गेल्या १९ वर्षे काँग्रेसच्या अध्यक्षपदी होत्या. काँग्रेसच्या इतिहासात प्रथमच एखाद्या व्यक्तीने इतक्या दीर्घकाळ पक्षाचे अध्यक्षपद भुषवले होते. मात्र, राहुल गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्यापासून त्यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे कधी जाणार, याची चर्चा सातत्याने सुरू होती. मात्र, राहुल यांची राजकीय अपरिपक्वता, धरसोड वृत्ती, निवडणुकीच्या मैदानातील निराशाजनक कामगिरी यामुळे पक्षाध्यक्ष म्हणून त्यांचा राज्याभिषेकाचा मुहूर्त सातत्याने लांबणीवर पडत राहिला. लोकसभा निवडणुकांनंतर सोनिया गांधी यांनी प्रकृतीच्या कारणामुळे संघटनेच्या कामकाजापासून दूर राहू लागल्यानंतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी पुन्हा एकदा राहुल यांनी अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी आग्रह धरला होता.

मात्र, लोकसभेनंतर काँग्रेस पक्षाला लागलेल्या पराभवाच्या ग्रहणामुळे राहुल यांच्याकडे पक्षाची सूत्रे देण्यासाठी योग्य मुहूर्त सापडत नव्हता. याशिवाय, राहुल गांधी यांनीदेखील ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी फारशी उत्सुकता दाखवली नव्हती. मात्र, मध्यंतरी अमेरिकेत झालेल्या एका चर्चासत्रात राहुल यांनी आपण निवडणूक लढवण्यास आणि पक्षाचे नेतृत्त्व स्वीकारण्यासाठी तयार असल्याचे सांगितले होते. तेव्हापासून राहुल गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वात कमालीचा बदल पाहायला मिळाला होता. गेल्या काही दिवसांपासून ते गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचा झंझावती प्रचार करत आहेत. यावेळी त्यांच्या देहबोली आणि भाषणांमध्ये कमालीचा आत्मविश्वास जाणवत आहे. त्यामुळे आतापर्यंत ‘पप्पू’ म्हणून हिणवण्यात येणारे राहुल गांधी राजकीय मैदानात पहिल्यांदाच मोदींसमोर ठामपणे उभे राहिले आहेत. याच प्रतीकात्मक पार्श्वभूमीचा लाभ उठवण्यासाठी काँग्रेसकडून गुजरात निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याच्या आधीच राहुल यांना पक्षाध्यक्षपदी बसवण्यात आल्याची शक्यता आहे.