राहुल गांधी यांचा जाहीर सभेत आरोप; पश्चिम बंगालमध्ये प्रचारसभा
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी निवडणूक सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. देशातील लोकशाही चिरडण्याचा मोदी यांचा प्रयत्न असून ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये त्याचीच पुनरावृत्ती करीत असल्याचा आरोप गांधी यांनी केला.
देशातील लोकशाही चिरडून टाकण्याचा मोदींचा प्रयत्न आहे. अरुणाचल प्रदेश आणि त्यानंतर उत्तराखंडमधील सरकार मोदींनी खाली खेचले, असे गांधी यांनी डाव्या आघाडीच्या नेत्यांसमवेत घेतलेल्या एका संयुक्त सभेत सांगितले. या वेळी व्यासपीठावर माकपचे माजी खासदार बंगसोगोपाळ चौधरी होते.
मोदी यांना देशात केवळ एकच नेता हवा आहे आणि तो नेता म्हणजे ते स्वत:च आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचा प्रसार करण्याचा मोदींचा प्रयत्न आहे. संपूर्ण हिंदुस्थानात एकच विचारसरणी हवी, देशात एकच विचार हवा, नागपूरचा विचार संपूर्ण देशात पसरविण्याचा प्रयत्न आहे, असा आरोपही या वेळी गांधी यांनी केला.
काँग्रेस आणि डाव्या आघाडीच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना गांधी यांनी, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीही मोदींचीच पुनरावृत्ती करीत असल्याचा आरोप केला. तृणमूलच्या खासदारांना आपण जेव्हा संसदेत भेटलो तेव्हा त्यांनीही, ममतांना जे हवे तेच होते, असे सांगितले, त्यांच्यापैकी कोणाच्याही मताला किंमत नाही, भाजपमध्येही तेच आहे, असेही गांधी म्हणाले.
प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार असलेले सरकार आपल्याला पश्चिम बंगालमध्ये हवे आहे. भाजप आणि तृणमूलमध्ये समझोता झाला आहे, मोदींनी उत्तराखंडमधील भ्रष्टाचार, सरकार स्टिंग ऑपरेशनचे उदाहरण देऊन खाली खेचले, मात्र बंगालमध्ये तृणमूलच्या खासदारांचे नारद स्टिंग ऑपरेशन करण्यात आले त्याकडे मोदी अन्य दृष्टीकोनातून पाहतात, असे गांधी म्हणाले. ममता बॅनर्जी शारदा चिट फंड घोटाळ्याबाबतही काहीही बोलण्यास तयार नाहीत, असेही त्यांनी नमूद
केले.