पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर पेगॅसस हेरगिरी प्रकरण समोर आल्यानं विरोधकांना सरकारला खिंडीत पकडण्याची संधी मिळाली. पेगॅसस प्रकरणाचे पडसाद संसदेत उमटत असताना आसाम-मिझोराम सीमेवर रक्तरंजित संघर्ष झाला. या दोन प्रमुख मुद्द्यांसह इतर विषयांवरून सरकारला अधिवेशनात कोंडीत पकडण्याची व्यूहरचना विरोधकांकडून केली जात आहे. काँग्रेसने यासाठी पुढाकार घेतल्याचं दिसत असून, राहुल गांधी यांनी विरोधी बाकांवरील नेत्यांना ब्रेकफास्ट आयोजित केला असून, यावेळी रणनीती ठरणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पेगॅसस हेरगिरी प्रकरणावरून संसदेत मागील दोन आठवड्यांपासून गदारोळ सुरू असल्याचं बघायला मिळत आहे. या मुद्द्यावर चर्चा करण्याची आणि चौकशी करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्याचबरोबर कृषी कायद्यांचा मुद्दाही पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कृषी कायद्यांवरूनही सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान, पेगॅससच्या देशातील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवल्याचं प्रकरण समोर आल्यानं विरोधक आक्रमक झालेले असून, त्यातच आता आसाम-मिझोराम सीमासंघर्षाची भर पडली आहे.

दोन्ही विषय ज्वलंत बनले असून, सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात या दोन्ही मुद्द्यांवरून कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधकांचा आहे. अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीत सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधकांकडून व्यूहरचना ठरवली जात आहे. यासाठी राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांची ब्रेकफास्ट मीटिंग आयोजित केली. दिल्लीती कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये ही बैठक होत आहे. या बैठकीला राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षांचे नेते हजर आहेत. या बैठकीत कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरही चर्चा होणार असल्याची माहिती आहे. बैठकीला १७ पक्षांचे १०० खासदार उपस्थित आहेत.