लोकसभेत अविश्वास ठरावाच्या चर्चेदरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपलं भाषण संपवलं आणि त्यानंतर त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली. आपल्या भाषणामध्ये केंद्र सरकारवर ताशेरे ओढल्यानंतर राहुल यांनी मोदींची घेतलेली ही गळाभेट सध्या देशभरात चर्चेचा विषय बनली आहे. सोशल मीडियावर या गळाभेटीबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत, तर अनेकांकडून ही गळाभेट राहुल गांधींनी आणि काँग्रेस पक्षाने आधीच ठरवली होती, त्यांनी जाणूनबुजून मोदींना अडचणीत आणण्यासाठी ही भेट घेतली अशी टीका होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राहुल गांधी आणि नरेंद्र मोदींच्या या गळाभेटीबाबत निरनिराळ्या प्रतिक्रिया येत असताना अखेर काँग्रेसकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. राहुल गांधीच्या गळाभेटीमुळे मोदी जेवढे चकित झाले, तेवढंच आश्चर्य आम्हालाही झालं होतं , पण ती राहुल गांधींकडून झालेली एक उत्स्फूर्त कृती(प्रतिक्रिया) होती, असं स्पष्टीकरण इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी दिलं आहे.तर, मोदींची गळाभेट घ्यायची हे आधीच ठरलं नव्हतं, राहुल गांधी असं काही करतील याबाबतची साधी कल्पनाही काँग्रेसच्या कोणत्याच नेत्याला नव्हती, इतकंच काय खुद्द सोनिया गांधीनाही याबाबत माहिती नव्हती असं वृत्त आजतकने दिलं आहे. काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनीही आपल्या एका ट्विटमध्ये गळाभेट घेण्याचं आधीच ठरलं नव्हतं याचं स्पष्टीकरण दिलं आहे. दुसरीकडे, राहुल गांधींनी केलेलं ते निव्वळ नाटक होतं, अशी प्रतिक्रिया भाजपाकडून देण्यात आली आहे.


दरम्यान, अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गळाभेट घेणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची चांगलीच फिरकी घेतली. ज्या लोकांना पंतप्रधान बनण्याची घाई झाली आहे ते चर्चेदरम्यानच इथे पंतप्रधानांच्या खुर्चीजवळ आले आणि उठा उठा म्हणायला लागले, असं म्हणत मोदींनी राहुल गांधींच्या गळाभेटीवर नाव न घेता टोला लगावला.

”आज सकाळी तर मी हैराण झालो. सभागृहात चर्चेला नुकतीच सुरूवात झाली होती, मतदानही झालं नव्हतं. जय-पराजयाचा निर्णयही झाला नव्हता. पण ज्यांना इथे पोहोचायची घाई आहे, ते आले आणि उठा, उठा म्हणायला लागले. पण इथून कुणी उठवू शकत नाही किंवा कुणीही बसवू शकत नाही. देशातील सव्वाशे कोटी जनताच इथे बसवू शकते आणि इथून उठवू शकते. लोकशाहीमध्ये जनतेवर विश्वास असायला हवा. इतकी काय घाई आहे इथे बसायची?”, अशा शब्दांमध्ये मोदींनी राहुल गांधींची खिल्ली उडवली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi hugs pm modi during no confidence motion and his congress is as surprised as bjp
First published on: 21-07-2018 at 01:30 IST