गुजरातचा दुसराही दौरा मंदिरांभोवतीच केंद्रीत; ‘टोकाच्या धर्मनिरपेक्षते’ऐवजी मवाळ हिंदुत्वाची कास धरल्याचे चित्र

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रतिमेला छेद देऊन ‘सिधी सय्यद की जाली’ या अहमदाबादमधील मशिदीला मध्यंतरी भेट दिली असताना दुसरीकडे ‘हिंदुत्वाची मूळ प्रयोगशाळा’ म्हणून ओळखल्या जात असलेल्या गुजरातमध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे मवाळ हिंदुत्वाचा छोटेखानी नवा प्रयोग करू पाहत असल्याचे चित्र उभे राहत आहे. ९ ते ११ ऑक्टोबरदरम्यानच्या आपल्या दुसऱ्या दौऱ्यातही ते चार प्रमुख मंदिरांमध्ये माथा टेकवणार आहेत. दिवाळीनंतरच्या तिसऱ्या दौऱ्यातही मंदिर दर्शनाचा त्यांचा सपाटा चालूच राहील.

९ ते ११ ऑक्टोबरदरम्यान राहुल हे मध्य गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. शेतकरी, पाटीदार (पटेल) समाज, व्यापारी आणि उद्योजक हे त्यांच्या दौऱ्याचे मुख्य केंद्रबिंदू राहतीलच; पण त्याचबरोबर गुजरातींच्या धार्मिक, आध्यात्मिक भावविश्वावर मनोराज्य असणाऱ्या चार प्रमुख मंदिरांतही ते जात आहेत. त्यामध्ये नाडियादमधील संतराम मंदिर, फगवेलमधील भातीजी महाराज मंदिर, बडोद्याजवळच्या पावागडचे कालीमाता मंदिर आणि डकोरमधील वैष्णवांच्या रणछोडजी मंदिराचा समावेश आहे.

अमेरिकेहून परतल्यानंतर केलेल्या पहिल्या दौऱ्याचा प्रारंभ राहुल यांनी भगवान श्रीकृष्णाच्या द्वारकाधीश मंदिरापासून केला होता. सौराष्ट्रातील पटेल व कोळी समाजाच्या श्रद्धास्थानांना त्यांनी भेटी दिल्या होत्या. त्यामध्ये द्वारका, कागवाड, वीरपूर आणि चोटिला मंदिराचा समावेश होता. यापैकी चोटिला हे कोळी समाजाचे आराध्य मंदिर. तब्बल सातशे पायऱ्या चढून राहुल त्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते.

पहिल्या दौऱ्यात त्यांना उत्तम आणि काही ठिकाणी तर अनपेक्षित प्रतिसाद मिळाल्याने पुढील दोन्ही दौऱ्यांच्या केंद्रस्थानी मंदिरे ठेवण्याचा निर्णय काँग्रेसच्या रणनीतीकारांनी घेतला आहे. दुसऱ्या दौऱ्यात मध्य गुजरातमधील मंदिरांनंतर तिसऱ्या दौऱ्यात उत्तर गुजरातमधील उंझा, अंबाजी आणि बेचरजी या प्रख्यात मंदिरांना भेटी देण्याचे त्यांचे नियोजन आहे. या नियोजनात अद्याप तरी कोणत्याही मशिदीला भेट देण्याचा समावेश नाही, हे विशेष. त्याचवेळी कदाचित ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वडनगर या जन्मगावातही जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्याच्या फायदेतोटय़ांचे गणित अजमावले जात आहे.

जपानचे पंतप्रधान शिन्झो अ‍ॅबे यांच्याबरोबर मोदींनी नुकतीच सोळाव्या शतकातील ‘सिधी सय्यद की जाली’ या मशिदीला भेट दिली होती. गुजरात दंगलींचा संदर्भ आणि आक्रमक हिंदुत्वाची प्रतिमा असलेल्या मोदींनी मशिदीला दिलेल्या भेटीची मोठी चर्चा झाली होती. त्याचप्रमाणे मुस्लीम अनुनयाचा शिक्का असतानाही राहुल यांच्या मंदिरांच्या दर्शनांनी अनेकांना बुचकळ्यात टाकलंय. ‘अतिटोकाच्या धर्मनिरपेक्षतेऐवजी मवाळ हिंदुत्वाकडे हळूहळू सरकण्याचा इरादा आहे. त्याची उपयुक्तता देशात इतरत्र माहीत नाही; पण किमान गुजरातमध्ये तरी त्याचा उपयोग नक्की आहे. गुजराती मानसिकतेमध्ये धर्म व अध्यात्माला असलेल्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही,’ अशी टिप्पणी काँग्रेसच्या नेत्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर केली. पूर्वी आसामच्या निवडणुकीतही राहुल यांनी हिंदूंच्या पवित्र स्थानांना भेटी दिल्याकडेही त्याने लक्ष वेधले. नोव्हेंबर ते डिसेंबरदरम्यान गुजरात विधानसभेच्या निवडणुका अपेक्षित आहेत. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ामध्ये त्याची घोषणा होऊ शकते.

  • ‘देवा, तुझ्या दारी आलो..’ (राहुल भेटी देणारी मंदिरे)
  • संतराम मंदिर, नाडियाद (जि. खेडा) : गुजरातींची अतूट श्रद्धा असलेल्या संतराम महाराजांचे हे मुख्य मंदिर. या संस्थेकडून अनेक समाजोपयोगी कामे केली जातात. अन्यत्रही अनेक मंदिरे.
  • भातीजी महाराज मंदिर, फगवेल (जि. खेडा) : पाचशे वर्षे जुने असलेले हे मंदिर. इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) पवित्र स्थान.
  • कालीमाता मंदिर, पावागड (जि. पंचमहल) : बडोद्याजवळ असलेले कालीमातेचे हे मंदिर अकराव्या शतकात बांधलेले आहे. ते सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान आहे.
  • रणछोडजी मंदिर, डकोर (जि. खेडा) : वैष्णवांचे असलेल्या या मंदिराला दरवर्षी ७० ते ८० लाख भाविक दर्शनासाठी भेट देतात.

द्वारकेत भगवान श्रीकृष्णाचे आशीर्वाद घेऊन राहुलजी भाजपरूपी कौरवांविरुद्धचे धर्मयुद्ध जिंकण्यासाठी निघालेत आणि आम्ही ते जिंकल्याशिवाय राहणार नाही. त्याचवेळी सर्मधर्मसमभावावरील काँग्रेसची निष्ठा कायम आहे. राहुलजींनी सर्वच धर्माच्या प्रार्थनास्थळांना भेटी दिल्यात..  – राजीव सातव, खासदार आणि गुजरात काँग्रेसचे सहप्रभारी