काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरसंधान साधले. सरकारने अर्थसंकल्पात काळ्या पैशाबाबतचे जाहीर केलेले धोरण म्हणजे काळा पैसा सफेद करण्याचा कट असल्याचा आरोप करीत सरकारचे काळा पैशाबाबतचे धोरण ही ‘फेअर अॅण्ड लव्हली’ योजना असल्याचा खोचक टोला राहुल यांनी मोदींना लगावला.

मोदी देशातील युवा पिढीबाबत नेहमी बोलतात पण त्यांनी देशातील युवांना दिलेले रोजगाराचे आश्वासन पाळलेले नाही. मोदी कोणाचेच ऐकत नाहीत. मुंबईत २६/११ हल्ल्यावेळी जवानांचे ऑपरेशन सुरू असताना गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना मुंबईत न जाण्याची विनंती त्यावेळच्या केंद्र सरकारने केली होती. पण मोदींनी ते ऐकले नाही. देशातील शेतकऱयाचे, तरुण पिढीचे, बेरोजगारांचे, दलितांचे, मागासवर्गीयांचे मोदी ऐकत नाहीत. हा देश म्हणजे पंतप्रधान नाही आणि पंतप्रधान म्हणजे देश नव्हे, असे राहुल यांनी मोदींना सुनावले. याशिवाय, आमचेही ऐका. आपण शत्रू नाहीत. आम्ही तुमचा तिरस्कार करत नाही, असेही राहुल पंतप्रधान मोदींना उद्देशून म्हणाले.

दरम्यान, जेएनयू वादावर बोलताना राहुल यांनी कन्हैय्या कुमारने देशविरोधी घोषणा दिल्या नसल्याचा दावा केला. कन्हैय्याचं मी संपूर्ण भाषण ऐकलं त्याने कोणत्याही देशविरोधी घोषणा केलेल्या नाहीत. देशातील युवापिढी ही जर देशाचे भविष्य असेल तर सरकारने त्यांचा आवाज दाबण्याचं काम करू नये. जेएनयूतील विद्यार्थी गरीब, आदिवासी आणि दलित असल्याचे सरकार त्यांच्या मागे लागले आहे. रोहित वेमुलाचाही आवाज दाबून त्याला आत्महत्या करण्याला सरकारने प्रवृत्त असा घणाघात राहुल यांनी सरकारवर केला.