पक्षांतर्गत गटबाजीबाबत चर्चा शक्य
राज्यातील विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटलेल्या मतांमुळे काँग्रेस गोटात अस्वस्थता पसरली आहे. या अस्वस्थतेचे गाऱ्हाणे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण, नवनिर्वाचित आमदारांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे दिल्लीत मांडले. राष्ट्रवादी काँग्रेस, मुंबई प्रदेश काँग्रेसच्या मुखपत्रातून झालेली टीका व मुंबईत पक्षात सुरू असलेल्या गटबाजीची सविस्तर माहिती चव्हाण यांनी पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांना दिली. त्या पाश्र्वभूमीवर राहुल गांधी येत्या १५ अथवा १६ जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे.
नववर्ष साजरे करून युरोपातून मायदेशी परतलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सक्रिय झाले आहेत. राज्यनिहाय नेत्यांना भेटून त्यांनी पक्षकामाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. अशोक चव्हाण, आ. भाई जगताप, सतेज पाटील व अमरीश पटेल यांनी राहुल व सोनिया यांची भेट घेतली. या भेटीत स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत निवडणुकीवर चर्चा झाली. मुंबई प्रदेश काँग्रेसचे मुखपत्र ‘काँग्रेस दर्शन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या पंडित जवाहरलाल नेहरू व सोनिया गांधी यांच्यावरील वादग्रस्त मजकुरावर राहुल गांधी यांनी तीव्र नाराजी केली आहे. मुंबई दर्शनमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुरानंतर काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली होती. महाराष्ट्र व दिल्लीतील नेत्यांना त्यासंबंधी स्पष्टीकरण द्यावे लागले होते.
या प्रकरणानंतर मुंबईत संजय निरुपम व गुरुदास कामत गटात सुरू असलेली रस्सीखेच चव्हाटय़ावर आली. त्यात संजय निरुपम यांची गच्छंती करण्याचा निर्णय काँग्रेसच्या उच्च पदाधिकाऱ्यांनी घेतला होता. परंतु पुढील वर्षी उत्तर प्रदेशची निवडणूक होणार असल्याने तूर्तास त्यांना अभय मिळण्याची शक्यता आहे. याच मुद्दय़ावर मुंबई दौऱ्यात राहुल गांधी स्थानिक नेत्यांशी विस्तृत चर्चा करणार आहेत.