भाजप स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी निवडणूक आयोगाचा वापर करून घेत आहे. गुजरातमधील पत्रकारांना जेलमध्ये धाडण्याच्या अप्रत्यक्ष धमक्या दिल्या जात आहेत, असा आरोप बुधवारी काँग्रेसकडून करण्यात आला. गुजरातमधील स्थानिक वृत्तवाहिनीला राहुल गांधी यांनी नुकतीच एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीचा दुसऱ्या टप्प्याचा प्रचार काल संपुष्टात आला. मात्र, तरीही राहुल गांधी यांनी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. हा त्यांच्या प्रचाराचा एक भाग होता. १९५१ च्या लोकप्रतिनिधी कायद्यानुसार मतदानाला ४८ तास उरले असताना कोणतीही राजकीय व्यक्ती अशाप्रकारची मुलाखत देऊ शकत नाही. त्यामुळे निवडणूक आयोग या प्रकाराची दखल घेऊन योग्य ती कारवाई करेल, असा विश्वास केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला.

अहमदाबादचा कल हिंदुत्वाकडे..

मात्र, काँग्रेसने हे सर्व आरोप फेटाळून लावले. उलट भाजपच राजकीय फायद्यासाठी निवडणूक आयोगाचा वापर करून घेत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला. भाजप पत्रकारांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांनी काही गुजराती वृत्तवाहिन्यांना मुलाखत दिल्यानंतर भाजपकडून संबंधित वृत्तवाहिन्यांना निवडणूक आयोगाच्या कारावाईची भीती दाखवली जात आहे. राहुल गांधी यांची मुलाखत प्रसारित करणाऱ्या वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांना जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली जात आहे. आम्ही भाजपच्या या उद्दाम वृत्तीचा निषेध करतो, असे रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले. दरम्यान, निवडणूक आयोगाने आपल्याकडे यासंबंधीची तक्रार आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्यामुळे आता आम्ही या मुलाखतीच्या डीव्हीडी गोळा करत आहोत. त्या पाहून आम्ही कायद्याचे उल्लंघन झाले आहे किंवा नाही, ते ठरवू असे गुजरात विधानसभा निवडणुकीचे मुख्याधिकारी बी बी स्वेन यांनी सांगितले.

..जबाबदारी वाढली, आता तरी खोटे बोलणे सोडा; भाजपचा राहुल गांधींना सल्ला