लोकसभा निवडणुकांचे रणमैदान जवळ आले आहे. देशात सात टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. अशात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची संपत्ती ५५ लाखांवरून ९ कोटींवर कशी पोहचली असा प्रश्न केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी विचारला आहे.

राहुल गांधी यांनी निवडणुकीसाठी अर्ज भरताना उत्पन्नाचे साधन सॅलरी अर्थात पगार असे म्हटले आहे. २००४ च्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांची संपत्ती ५५ लाख ३८ हजार १२३ रुपये अशी जाहीर केली होती. २००९ मध्ये ही संपत्ती २ कोटींवर पोहचली तर २०१४ मध्ये ९ कोटींवर पोहचली. राहुल गांधी यांनी त्यांच्या उत्पन्नाचे साधन पगार असे दिले आहे तर आम्हाला जाणून घ्यायचे आहे की त्यांची संपत्ती ५५ लाखांवरून ९ कोटींवर कशी काय पोहचली असे भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.

एकीकडे राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा नेत्यांवर टीकेचे ताशेरे झाडत आहेत. चौकीदार चोर है ही घोषणा त्यांनी लोकप्रिय केली. तर आता दुसरीकडे भाजपा नेत्यांनीही त्यांच्याविरोधात मोहीम उघडली आहे. राहुल गांधींनी त्यांची संपत्ती ५५ लाखांवरून ९ कोटींवर कशी पोहचली याचं उत्तर द्यावं असं आता भाजपानं म्हटलं आहे. राहुल गांधी हे खासदार आहेत मिळणारा पगार हे त्यांनी त्यांचे उत्पन्नाचे साधन दाखवलं आहे मग असं असताना त्यांच्या संपत्तीत इतकी वाढ कशी झाली? याचं उत्तर त्यांनी द्यायला हवं असं रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.