सध्या मुस्लिमांचा पवित्र रमजानचा महिना सुरु असून विविध राजकीय पक्षांकडून इफ्तार पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. यामध्ये देशातील दोन प्रमुख राजकीय पक्ष अर्थात काँग्रेस आणि भाजपाचा देखील समावेश आहे. मात्र, या दोन्ही पक्षांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्ट्यांवरून परस्परांवर राजकीय चिखलफेक सुरु झाली असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची इफ्तार पार्टी ही राजकीय फायद्यासाठी असल्याचा आरोप बुधवारी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केला. तर मी आयोजित केलेली इफ्तार पार्टी तिहेरी तलाक पीडितांसाठी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


काँग्रेसच्यावतीने आज राजधानी दिल्लीतील एका फाईव्ह स्टार आलिशान हॉटेलमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, प्रतिभा पाटील, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि अनेक विरोधी पक्षाचे नेते या पार्टीला हजेरी लावणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच राहुल गांधींनी या पार्टीचे आयोजन केले आहे.

नक्वी म्हणाले, राहुल गांधींच्या इफ्तार पार्टीच्या आयोजनाला माझा विरोध नाही. मात्र, त्यांनी राजकीय फायद्यासाठी याचे आयोजन केले आहे. तर, मी आयोजित केलेली इफ्तार पार्टी गरजू लोकांच्या फायद्यासाठी आहे.

महत्वाच्या मुद्द्यांवर भाजपाविरोधात विरोधी पक्षांना एकत्र आणताना राजकीय व्यूहरचना आखण्यासाठी काँग्रेसने या इफ्तार पार्टीचे आयोजन केल्याचे सुत्रांकडून कळते. त्याचबरोबर बिहारमध्येही इफ्तार पार्टीच्या निमित्ताने लालूपुत्र तेजस्वी यादव यांनी नितीशकुमार यांना घेरण्याची तयारी सुरु केली आहे. तेजस्वी यांच्या इफ्तार पार्टीला सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. इतकेच नव्हे तर तेजस्वी यांनी बिहार सरकारमधील सहकारी पक्षाचे नेते उपेंद्र कुशवाहा यांनाही पार्टीसाठी निमंत्रण दिले आहे.