केरळमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी केरळ दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते कॉंग्रेस नेत्यांशी निवडणूक रणनीतीबाबत चर्चा करणार आहेत.
मंगळवारी दुपारी विशेष विमानाने राहुल गांधी यांचे केरळमध्ये आगमन होईल. केरळचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष व्ही. एम. सुधीरन यांनी काढलेल्या ‘जनरक्षा मार्च’ची सांगता राहुल यांच्या भाषणाने होणार आहे. त्यानंतर ते पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेणार आहेत. बुधवारी राहुल हे कॉंग्रेस प्रदेश समितीच्या कार्यकारिणीची बैठक घेणार असून, राज्यातील पक्षाशी संलग्न संघटनांच्या नेत्यांनाही ते भेटणार आहेत.
बार लाच प्रकरण आणि सौरऊर्जा घोटाळ्यामुळे राज्यातील कॉंग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडी सरकार अडचणीत आले आहे. या पाश्र्वभूमीवर राहुल यांच्या या दौऱ्यामुळे कॉंग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, अशी आशा पक्ष कार्यकर्त्यांना आहे.