उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राज्यात किसान यात्रा सुरू केली आहे. काँग्रेसचे निवडणूक सल्लागार प्रशांत किशोर यांनी राहुल यांना शेतकरी आणि ब्राह्मणांवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला आहे. उत्तर प्रदेशमध्ये खाट सभा घेण्याची कल्पना प्रशांत किशोर यांचीच आहे. या सभेत शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा सल्ला प्रशांत किशोर यांनी दिला होता. या सभांसाठी इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटी (आयपीएसी) ने लखनऊ येथून चार हजार खाट मागवल्याचे काँग्रेसच्या सूत्राने सांगितले. प्रत्येक सभेच्या ठिकाणी दीड ते दोन हजार खाट ठेवायच्या व कार्यक्रम संपल्यानंतर ते पुढच्या सभेसाठी न्यायच्या असे त्यांचे नियोजन होते. मंगळवारी राहुल गांधी यांनी मंगळवारी देवरिया येथील रूद्रपूर येथे आपली पहिली खाट सभा घेतली. या सभेत सुमारे १२०० खाट होते.
रूद्रपूर येथे राहुल गांधी यांची सभा झाल्यानंतर लोक खाट घेऊन जाण्यासाठी तुटून पडले. काहींनी संपूर्ण खाट आहे तशी नेली तर काहींनी त्याचे तुकडे करून नेली. हे सर्व सुरू असतना पोलीस फक्त पाहत होते. त्यांनी कोणालाच रोखले नाही, असे आयपीएसीच्या कार्यकर्त्याने सांगितले. याबाबत राजीव गाधी महिला विकास योजनेच्या सदस्य सरस्वती यांना विचारला असता त्यांनी शेतकऱ्यांना राहुल गांधी यांच्याकडून भेट असल्याचे सांगितले. काँग्रेस नेहमी शेतकऱ्यांचा विचार करते हे सांगण्यास त्या विसरल्या नाहीत.