पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घूमजाव सरकारविरुद्ध मंगळवारी काँग्रेसने पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली संसदेजवळ निदर्शने केली.
मोदी सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी अनेक आश्वासने दिली होती; मात्र त्याबाबत सातत्याने कोलांटउडय़ा मारल्या, अशी टीका करणारी पुस्तिका सोमवारी काँग्रेसने प्रकाशित केली होती.
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या संसदीय व्यवहार समितीची बैठक झाल्यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या खासदारांनी म. गांधीजींच्या पुतळ्यासमोर धरणे धरले होते.
सरकारच्या नावाखाली भाजप सरकारने थट्टा चालविली असल्याचा आरोप करणारी पुस्तिका या वेळी राहुल गांधी आणि अन्य खासदारांनी फडकावली. ‘छ महिने पार, यू-टर्न सरकार’ ही ३० पानांची पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री निरंजन ज्योती यांचे वादग्रस्त विधान, भाजप सरकारचे घूमजाव आणि छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेला हल्ला हे प्रश्न संसदेत उपस्थित करण्याचा निर्णय पक्षाच्या संसदीय व्यवहार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.