लोकसभा निवडणुकीतील पराभवापासून खचलेल्या कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे आक्रमक रुप बुधवारी लोकसभेत पाहायला मिळाले. लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दुजाभाव करीत असल्याचा आरोप करीत राहुल गांधी स्वतः अध्यक्षासमोरील मोकळ्या जागेत आल्याचे बुधवारी पाहायला मिळाले. कॉंग्रेसच्या खासदारांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.
संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, देशातील कोणत्याही विषयापेक्षा केवळ एकाच व्यक्तीचा आवाज ऐकला जावा, असे वातावरण संसदेमध्ये तयार करण्यात येते आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला कोणत्याही विषयावर चर्चा घडवून आणायची नाही. तशीच त्यांची मानसिकता असल्याचा आरोप त्यांनी केला. संसदेत विरोधकांना बोलू दिले जात नसल्याचेही ते म्हणाले.
उत्तर प्रदेशातील जातीय हिंसाचाराच्या घटनांवरून कॉंग्रेसच्या खासदारांना लोकसभेत चर्चा घडवून आणायची आहे. त्याचबरोबर जातीय हिंसाचार विधेयक लवकरात लवकर संसदेमध्ये मांडण्याची मागणीही कॉंग्रेसने केली आहे.