उत्तर प्रदेशसाठी प्रस्ताव; मात्र यंदा पक्षाध्यक्षपद स्वीकारण्याची काँग्रेस नेत्यांना अपेक्षा

लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारावी, अशी आग्रही मागणी होत असतानाच राहुल यांना उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी द्यावी, असा प्रस्ताव निवडणूक रणनीतीतज्ज्ञ प्रशांत किशोर यांनी दिला आहे. मात्र,राहुल  यंदा पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारतील अशी अपेक्षा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केली आहे.

उत्तर प्रदेशात पुढील वर्षी निवडणूक होणार असून राहुल गांधी यांना पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केल्यास ते काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी पोषक ठरेल, असा प्रस्ताव प्रशांत किशोर यांनी ठेवल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी राहुल यांच्या अध्यक्षपदाचे संकेत दिल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

याबाबत ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले की, प्रशांत किशोर यांनी कोणता प्रस्ताव ठेवला आहे त्याची आपल्याला कल्पना नाही. राहुल गांधी लोकसभेत अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात, ते पक्षाचे उपाध्यक्ष आहेत आणि २०१६ मध्ये ते काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारतील अशी आम्हा सर्वाची अपेक्षा आहे, असे रमेश म्हणाले. राहुल गांधी २९ राज्यांचे मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत, त्यामुळे ते पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारतील अशी आमची अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.राहुल गांधी इच्छुक नसल्यास प्रियंका गांधी यांच्या नावाला प्रशांत किशोर यांनी दुसऱ्या क्रमांकाची पसंती दिली आहे, असे विचारले असता रमेश यांनी, त्याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले. पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनीही राहुल यांच्याबाबत असलेली इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे. काँग्रेस कार्यकारिणी समितीने गेल्या सप्टेंबर महिन्यांत सोनिया गांधी यांच्या अध्यक्षपदाला एक वर्ष मुदतवाढ दिली होती. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची धुरा स्वीकारणे हा आता काही महिन्यांचाच प्रश्न राहिला असल्याचे त्यांचे निकटवर्तीयही सांगत आहेत.

निवडणूक रणनीतितज्ज्ञ प्रशांत किशोर यांचे प्रस्ताव

  • उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार असून काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, प्रियंका गांधी-वढेरा अथवा एखाद्या ब्राह्मण चेहऱ्याला मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करावे, असा प्रस्ताव निवडणूक रणनीतितज्ज्ञ प्रशांत किशोर यांनी काँग्रेससमोर ठेवला आहे.
  • लोकसभेच्या पुढील निवडणुकीत काँग्रेसला पुनरागमन करावयाचे असल्यास राहुल गांधी यांना स्वत:ला सिद्ध करावे लागेल, राहुल यांच्या नेतृत्वाखाली निवडणूकजिंकली याची खात्री पटल्यास चित्र बदलू शकते, राहुल यांच्या शक्तिप्रदर्शनासाठी उत्तर प्रदेशची निवडणूक ही उत्तम संधी आहे आणि म्हणूनच त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद द्यावे, असा प्रशांत किशोर यांचा प्रस्ताव आहे.
  • मुख्यमंत्रिपदासाठी राहुल गांधी इच्छुक नसतील तर प्रियंका गांधी-वढेरा हा प्रस्ताव पक्षासाठी फायदेशीर ठरेल. मात्र हे दोघेही इच्छुक नसल्यास एखादा सुपरिचित ब्राह्मण चेहरा द्यावा, असे  निवडणूक रणनीतितज्ज्ञ प्रशांत किशोर यांचे म्हणणे आहे.
  • उत्तर प्रदेशात १० ते १२ टक्के ब्राह्मण समाज आहे, त्यांची मते मिळतील अशी काँग्रेस अपेक्षा करू शकते, मात्र त्यासाठी पक्षाला ब्राह्मण चेहरा द्यावा लागेल.