पंजाबमध्ये केवळ अकाली दलाच्या लोकांचीच भरभराट होत असल्याची टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी केली. राज्यातील काँग्रेस एकसंध असल्याचा दावाही त्यांनी केला. गेल्या महिन्यात धर्मग्रंथाच्या विटंबनेच्या घटनांचा विरोध करताना मारल्या गेलेल्या युवकांच्या कुटुंबांना भेटण्यासाठी राहुल गांधी यांचे फरीदकोट येथे रेल्वेने आगमन झाले. .

राज्य काँग्रेसमधील गटबाजीच्या पाश्र्वभूमीवर आणि विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवून राहुल म्हणाले की, दोन वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीत पंजाबमधील काँग्रेस पंजाब, येथील शेतकरी, दलित व शेतमजूर यांच्या भवितव्यासाठी एकत्रितपणे लढा देईल. एकत्र लढून काँग्रेस राज्यातील सध्याचे अकाली दल- भाजपचे सरकार बदलून टाकेल. राज्याच्या चांगल्या भवितव्यासाठी आम्ही एकत्र राहू असे आश्वासन पक्षाच्या पंजाबमधील सर्व ज्येष्ठ नेत्यांनी मला दिले आहे, असेही त्यांनी सांगितले.