लोकसभेच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीत भाजपविरुद्ध विरोधकांची एकत्रित आघाडी उभी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले असून त्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची येथे भेट घेतली, असे सूत्रांनी सांगितले.

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षाची कामगिरी खराब झाल्याच्या पाश्र्वभूमीवर गांधी यांनी पवार यांची भेट घेतली. उत्तर प्रदेशातील गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा पोटनिवडणुकांत भाजपचा पराभव झाल्यानंतर गांधी यांनी बुधवारी रात्री पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. भाजपविरुद्ध विरोधकांची संयुक्त आघाडी उभी करण्याबाबत गांधी आणि पवार यांच्यात चर्चा झाल्याचे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेत्या सोनिया गांधी यांनी विरोधकांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्याला २० पक्षांचे नेते हजर होते. त्यानंतर गांधी आणि पवार यांची भेट झाली. राहुल गांधी लवकरच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही भेट घेणार आहेत. शरद पवार यांनी २८ मार्च रोजी विरोधी पक्षांची संयुक्त बैठक आयोजित केली असून त्याला ममता बॅनर्जी हजर राहण्याची शक्यता आहे. भाजपचा पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर विरोधकांची संयुक्त आघाडी उभी करण्याची कल्पना समोर आली.