काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी देशाबाहेर गेले आहेत. मात्र देशाबाहेर जाण्याआधी त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या ट्रोल आर्मीला एक खास संदेश दिला आहे. यूपीएच्या प्रमुख सोनिया गांधी यांच्या वार्षिक वैद्यकीय तपासणीसाठी राहुल त्यांच्यासोबत देशाबाहेर गेले आहेत. राहुल आणि सोनिया गांधी नेमके कुठल्या देशात गेलेत त्याबद्दल काहीही माहिती मिळू शकलेली नाही. राहुल यांच्या परदेश दौऱ्यावरुन नेहमीच वाद होतात. त्यामुळे राहुल यांनी यावेळी आपण कशासाठी देशाबाहेर चाललो आहोत ते स्पष्ट केले आहे.

सोनियाजींच्या वैद्यकीय तपासणीसाठी मी त्यांच्यासोबत काही दिवसांसाठी देशाबाहेर चाललो आहे. भाजपाच्या सोशल मीडिया ट्रोल आर्मीमधील माझ्या मित्रांना मी एकच सांगू इच्छितो कि, जास्त काम करु नका, मी लवकरच परतणार आहे असे टि्वट राहुल यांनी केले आहे. २०११ साली सोनिया गांधींवर अमेरिकेत शस्त्रक्रिया झाली होती. राहुल गांधी आठवडयाभराच्या आत देशात परततील तर सोनिया गांधी काही दिवस परदेशातच मुक्काम करु शकतात.

राहुल गांधींच्या या खोचक टि्वटला भाजपाच्या सोशल मीडिया सेलनेही लगेच त्याच प्रकारे प्रत्युत्तर दिले. आम्ही सोनिया गांधींच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतो. कर्नाटकातील महिलाही मंत्रिमंडळाच्या स्थापनेची वाट पाहत आहेत. जेणेकरुन राज्य सरकारला त्यांच्या सेवेची संधी मिळेल. तुम्ही जाण्याआधी कर्नाटकात सरकारचे कामकाज सुरु होईल ? तुम्ही परदेशातूनही मनोरंजन कराल अशी सोशल मीडियाला अपेक्षा आहे असे भाजपाने टि्वटमध्ये म्हटले आहे.