केरळ दौ-यावर असलेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी निवृत्त परिचारिका (नर्स) राजम्मा यांची भेट घेतली. या नर्सचे पुर्ण नाव राजम्मा वावथिल आहे. या नर्सचे वैशिष्ट्य म्हणजे ही तिच नर्स आहे जी राहुल गांधींच्या जन्मावेळी रूग्णालयात हजर होती.

राहुल यांनी कोझिकोड येथे राजम्माची भेट घेत त्यांची चौकशी केली. यावेळी ते काहीसे भावुकही झाले होते. त्यांनी राजम्मांना प्रेमाने अलिंगन दिले शिवाय या खास भेटीचे फोटो त्यांनी आपल्या टि्वीटरवर देखील शेअर केले. गत लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी जेव्हा वायनाड मतदार संघातुन आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले होते, तेव्हा राजम्मांनी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती.

या अगोदर राजम्मांनी पीटीआयशी बोलाताना सांगितले होते की, मी भाग्यशाली आहे कारण मी त्या काही व्यक्तींपैकी एक होती ज्यांनी राहुल यांचा जन्म झाला तेव्हा त्यांना हातात घेतले होते. मी त्यांच्या जन्माची साक्षीदार आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या नातवाला पाहून आम्ही भारावून गेलो होतो. राहुल यांच्या जेव्हा जन्म झाला तेव्हा राजम्मा नर्सिंगचे प्रशिक्षण घेत होत्या आता त्या निवृत्त झाल्या आहेत. लोकसभा निवडणुक काळात जेव्हा राहुल यांच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले तेव्हा ७२ वर्षीय राजम्माने म्हटले होते की, राहुल यांच्या नागरिकत्वाबाबत सशंय घेतला जाऊ नये , कारण १९ जून १९७० रोजी जेव्हा दिल्लीतील होली फॅमिली रूग्णालयात राहुल यांचा जन्म झाला तेव्हा त्या रूग्णालयातच उपस्थित होत्या. त्यांनी हे देखील सांगितले की रूग्णालयात अजुनही सर्व माहिती उपलब्ध असायला हवी.