काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी बेपत्ता असल्याचे पोस्टर त्यांच्या अमेठी लोकसभा मतदारसंघात लावण्यात आले आहेत. राहुल गांधींना शोधून आणणाऱ्यास बक्षीस देण्यात येईल, असा उल्लेख पोस्टरमध्ये करण्यात आला आहे.

अमेठी येथील काँग्रेसच्या कार्यालयासमोर हे पोस्टर लावण्यात आले आहेत. खासदार राहुल गांधी अमेठीमधून बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे लोकसभा मतदारसंघातील विकासकामे त्यांच्या कार्यकाळात ठप्प झाली आहेत, असा मजकूर या पोस्टरवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. राहुल गांधी यांच्या अशा वागण्यानं अमेठीतील जनतेची फसवणूक झाली आहे. तसंच त्यांचा एकप्रकारे अपमान झाला आहे, अशी व्यथा येथील जनतेनं या पोस्टरमधून मांडली आहे. दरम्यान, देशभरात विविध ठिकाणी दौरे करणारे राहुल गांधी अमेठी मतदारसंघात गेल्या सहा महिन्यांपासून आले नाहीत, असं सांगण्यात येत आहे. राहुल गांधी यांची बदनामी करण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचा डाव आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेस समितीचे जिल्हाध्यक्ष योगेंद्र मिश्रा यांनी केला आहे. राहुल गांधी हे पक्षाचे उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे ते प्रत्येक वेळी अमेठी या त्यांच्या मतदारसंघात येऊ शकत नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.