कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाब विचारला आहे. पंतप्रधान मोदी तुम्ही अजून गप्प का ? तुमचे मौन राहणे अजिबात मान्य नाही असे राहुल गांधींनी म्हटले आहे.  कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी काल रात्री राहुल गांधी यांनी इंडिया गेटवर कँडल मार्च काढला होता.

त्यानंतर आज शुक्रवारी त्यांनी थेट मोदींना प्रश्न विचारले आहेत.  महिला आणि लहान मुलांविरोधात हिंसाचार वाढत आहे त्याबद्दल मोदी तुम्हाला काय वाटते ?   बलात्कारी आणि हत्येच्या आरोपींचा राज्य सरकार का बचाव करत आहे ? असे प्रश्न राहुल यांनी टि्वटरवरुन थेट मोदींना विचारले आहेत. मोदी तुम्ही कधी बोलणार, देश तुमच्या बोलण्याची वाट पाहत आहे असे राहुल यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

मोदींनी महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करावी –

राहुल गांधी यांनी कॅण्डल मार्च दरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ‘हा राजकीय मुद्दा नसून राष्ट्रीय मुद्दा आहे. आज महिलांची जी परिस्थिती आहे त्याचा सरकारने विचार करण्याची गरज आहे. भारतातील महिलांना आज भीती वाटत आहे. महिलांच्या सुरक्षेचं काम नरेंद्र मोदींनी सुरु केलं पाहिजे. या मोर्चात सर्व पक्षांचे लोक आले आहेत, सामान्य लोकही सहभागी झाली आहेत. जी आश्वासंन मोदी सरकारने निवडणुकीच्या आधी दिली होती ती पर्ण करण्यात यावीत’.