नरेंद्र मोदी यांच्या सरकारने २००२ च्या दंग्यांना चिथावणी दिली, असा थेट आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी एका मुलाखतीत केला. दुसरीकडे काँग्रेसने मात्र १९८४ मध्ये शिखविरोधी दंगे रोखण्याचा प्रयत्न केला, असा दावा करून दंग्याबाबत राहुल यांनी माफी मागण्यास नकार दिला.
मोदी यांच्यावर थेट हल्ला चढवताना राहुल यांनी २००२ च्या गुजरात दंगलीत सरकारचा सहभाग होता, असा आरोप केला तर ८४ च्या दंगलीत सरकारचा सहभाग नव्हता, असा दावा करून हा दोन घटनांमध्ये फरक आहे, याकडे लक्ष वेधले. मात्र ८४ च्या दंगलीत काही काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होते हे त्यांनी मान्य केले. या दंगलीबाबत काँग्रेसच्या वतीने माफी मागणार काय? असे विचारता, आपला त्यात सहभाग नव्हता असे सांगत माफी मागण्यास राहुल यांनी नकार दिला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच विजयी होईल असा आत्मविश्वास व्यक्त करतान, पक्षाची यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे सांगितले. काँग्रेस पराभूत झाल्यास त्याची जबाबदारी उपाध्यक्ष म्हणून स्वीकारू असे स्पष्ट केले.
मोदीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत विचारले असता, भाजपला एका व्यक्तीमध्ये सत्तेचे केंद्रीकरण करायचे आहे, असे सांगितले. पंतप्रधानपदाबाबत उत्तर देण्याचे त्यांनी टाळले, खासदारच याबाबत ठरवतील याचा पुनरुच्चार केला.