काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपली केवळ फसवणूक केली. त्यांनी मदतीचे आश्वासन दिले होते मात्र, ते पूर्ण केले नाही असा आरोप सुनीता कोरी या महिलेने केला आहे.
राहुल गांधी २६ जानेवारी २००८ रोजी या मतदारसंघातील रहिवासी सुनीता यांच्या घरी गेले होते. तिथे त्यांनी गावातील लोकांसोबत एक रात्र काढली होती. त्यावेळी राहुल गांधी यांनी सुनीता यांची परिस्थिती हलाकीची आहे असे म्हणत त्यांना घर बांधून देण्याचे आश्वासन दिले होते परंतु, अजूनही कोरी यांना काही घर बांधून मिळाले नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी दिलेले आश्वासन पाळले नसल्याचे कोरी म्हणल्या.
कुमार विश्वास यांनी सोमवारी सुनीता यांच्या घरी भेट दिली. राहुल गांधी यांच्या भेटीनंतरही सुनीता यांची परिस्थिती सुधारली नाही. आजही त्या कष्टप्रद आयुष्य जगताहेत, असे कुमार विश्वास या भेटीनंतर म्हणाले. कुमार विश्वास यांनी सुनीता यांच्यासोबत त्यांच्यापुढील प्रश्नांबाबत चर्चा केली आणि त्यांना हवी ती मदत तातडीने करावी, अशी सूचना पक्षाच्या कार्यकर्त्यांना केली.