काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी सकाळी केदारनाथ मंदिराला भेट दिली. यावेळी राहुल गांधींनी गौरीकुंड ते केदारनाथ मंदिर अशी जवळपास १६ किमी अंतराची पदयात्रा करून केदारनाथाचे दर्शन घेतले. कोणतीही मागणी करण्यासाठी येथे आलेलो नसून केवळ केदारनाथाचे दर्शन घेतले. केदारनाथच्या दर्शनाने आपल्याला शक्ती मिळाली असल्याचे राहुल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी राहुल यांच्यासोबत काँग्रेसचे स्थानिक नेतेही उपस्थित होते.
गुरूवारी मध्यरात्री २ वाजल्याच्या सुमारास राहुल गांधी उत्तराखंड सरकारच्या हेलिकॉप्टरने मुख्यमंत्री हरिष रावत आणि प्रदेश अध्यक्ष अंबिका सोनी यांच्यासह गौरीकुंड येथे पोहोचले. त्यानंतर मध्यरात्रीच राहुल यांनी गौरीकुंड ते लिनचोली अशी १० किमी अंतराची पदयात्रा करून लिनचोली येथे मुक्काम केला. पुन्हा पहाटे ६ वाजता लिनचोली ते केदारनाथ अशी ६ किमी पदयात्रा करत राहुल यांनी केदारनाथ मंदिर गाठले.