उत्तर प्रदेशात काँग्रेसला वगळून समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्ष यांनी आघाडी केल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही आव्हान स्वीकारून त्या राज्यात काँग्रेस लोकसभा निवडणूक संपूर्ण ताकदीनिशी लढवील, असे जाहीर केले आहे.

दुबई येथे पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले,की या दोन्ही पक्षांच्या नेत्यांविषयी मला खूप आदर आहे. त्यांना जे हवे ते करण्याचा त्यांना अधिकार आहे. आम्ही उत्तर प्रदेशात स्वबळावर निवडणूक लढवू, त्यात आमचा पक्ष सर्व क्षमता पणाला लावेल. बहुजन समाज पक्ष व समाजवादी पक्ष यांनी राजकीय निर्णय घेतला आहे, त्यामुळे आता उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्ष बळकट करणे हेच आमच्या हातात आहे. आम्ही संपूर्ण ताकदीनिशी लढू यात शंका नाही.

समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्ष यांनी आघाडीत प्रवेश न दिल्याने तो काँग्रेसला मोठा फटका आहे, यावर विचारले असता ते म्हणाले की, या आघाडीने मी निराश झालेलो नाही. भाजपला सत्तेवर येऊ न देणे हा आमचा कार्यक्रम आहे, तो यातून साध्य होणारच आहे. आमचा पक्ष या दोन पक्षांबरोबर लढला किंवा नाही याने फरक पडणार नाही. फलनिष्पत्ती ही भाजपला जास्त जागा मिळणार नाहीत हीच आहे.

संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर विचारले असता त्यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांनी अनिल अंबानी यांना तीस हजार कोटी मिळवून दिले. लोकसभेत याचे पंतप्रधानांनी स्पष्टीकरण करणे अपेक्षित होते, त्याऐवजी त्यांनी वेगळ्याच व्यक्तीला त्यांच्या समर्थनार्थ उभे केले.

काँग्रेसला आधीपेक्षा दुप्पट जागा मिळतील – आझाद

लखनौ : समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्ष यांनी त्यांच्या आघाडीतून वगळल्यानंतर आता काँग्रेसने उत्तर प्रदेशात सर्व ८० जागा एकटय़ाने लढवण्याचे ठरवले आहे. असे असले तरी भाजपला टक्कर देणाऱ्या निधर्मी पक्षांनी प्रस्ताव मांडल्यास त्यांच्याशी आघाडी करण्याची तयारी असल्याचे  पक्षाने सूचित केले आहे. काँग्रेसचे उत्तर प्रदेशातील प्रभारी गुलाम नबी आझाद यांनी सांगितले,की उत्तर प्रदेशात काँग्रेस सर्व ८० जागा स्वबळावर लढवून भाजपचा पराभव करील. काँग्रेसला आधीपेक्षा दुप्पट जागा मिळतील. २०१४ मध्ये काँग्रेसला २१ जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रीय लोकदलाशी आघाडीबाबत त्यांनी सांगितले की, या प्रश्नावर आपण माध्यमांशी बोलणार नाही.