राहुल गांधी यांचा घणाघाती आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १५ निवडक उद्योगपतींचे ३.५ लाख कोटींचे कर्ज माफ केले असून छत्तीसगडमधील रमणसिंह यांचे सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी येथे केला. प्रचाराच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी रमणसिंह सरकारला धारेवर धरताना चिट फंड घोटाळा, नागरी पुरवठा घोटाळा, मुख्यमंत्र्यांचे पुत्र अभिषेक सिंह यांचा पनामा पेपर्स घोटाळ्यात सहभाग या सगळ्या गोष्टींचा समाचार घेतला.

ते म्हणाले की, गेली चार-पाच वर्षे मोदी यांनी १५ श्रीमंत व्यक्तींना ३.५ लाख कोटींची कर्जे दिली. मनरेगासाठी ३५ हजार कोटींची तरतूद आवश्यक असताना त्याच्या दहा पट कर्ज निवडक पंधरा उद्योगपतींना देण्यात आले. मध्य प्रदेश व छत्तीसगड  ही गेल्या पाच वर्षांत कृषी  केंद्रे व्हावीत, देशाला त्यांनी अन्न, फळे व भाजीपाल्याचा पुरवठा करावा असे मला वाटते. मोदी यांनी तिजोरीच्या चाव्या पंधरा उद्योगपतींकडे दिल्या आहेत, पण काँग्रेस मात्र त्या चाव्या शेतकरी, युवक, गरीब, महिला व आदिवासींच्या हवाली करणार आहे. मोदी यांचा केवळ पंधरा उद्योगपतींवर विश्वास आहे पण आमचा देशातील कोटय़वधी लोकांवर विश्वास आहे.

रमणसिंह यांचे सरकार भ्रष्टाचारात बुडाले असल्याचा आरोप करून गांधी म्हणाले की, चिट फंड घोटाळ्यात लोकांचे पाच हजार कोटी गेले. यात साठ लोक मरण पावले. ३१० गुन्हे दाखल झाले पण कुणीच तुरुंगात गेले नाही कारण मुख्यमंत्र्यांनाच यात कारवाई करायची नाही. नागरी पुरवठा यंत्रणेतून ३६ हजार कोटींवर डल्ला मारण्यात आला. रमणसिंह सरकारचा यात सहभाग असल्याचे पुरावेही आहेत. एका डायरीत हे पैसे डॉक्टरसाहेबांना दिल्याचे म्हटले आहे. हे डॉक्टरसाहेब दुसरे तिसरे कुणी नसून रमणसिंहच आहेत. जर मुख्यमंत्री या प्रश्नांची उत्तरे देणार नसतील तर त्यांनी त्यांच्या मुलावर पनामा पेपर्स प्रकरणी काय कारवाई केली हे तरी सांगावे. पाकिस्तानात तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे नाव पनामा पेपर्समध्ये आल्यानंतर त्यांना तुरुंगात जावे लागले. रमण सिंह सरकारच्या पंधरा वर्षांत राज्यात ४० लाख तरुण बेरोजगार आहेत. ६५ टक्के जमिनीवर पाटबंधाऱ्यांची सोय नाही. ५६ हजार एकर जमीन आदिवासींकडून हिसकावण्यात आली. भाजप सरकारने इतर राज्यातील लोकांना येथील कामे दिली आहेत.