राहुल गांधी यांचा लंडनमध्ये आरोप

अब्जावधी रुपयांच्या राफेल लढाऊ जेट विमान खरेदी प्रकरणात भाजप सरकारने कर्जाच्या सापळय़ात असलेल्या एका उद्योगपतीच्या भल्यासाठी करारामध्ये पाहिजे तसे बदल केले, असा घणाघाती आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे केला.

नॅशनल इंडियन स्टुडंट्स अँड अ‍ॅल्युमनी युनियन या संस्थेच्या येथील कार्यक्रमात त्यांनी लंडन स्कूल ऑफ  इकॉनॉमिक्स येथे असे सांगितले, की पंतप्रधान मोदी यांनी एका उद्योगपतीला लाभ मिळावा यासाठी राफेल विमान खरेदी करारात बदल केले. या उद्योगपतीला विमाने बनवण्याचा अनुभवही नाही. केवळ एका उद्योगपतीच्या लाभासाठी यूपीए सरकारने आधी कमी किमतीत केलेला करार भाजपने बदलला. त्यात विमानांची किंमत तिपटीने वाढवण्यात आली.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा निशाणा रिलायन्स समूहाचे अनिल अंबानी यांच्यावर असून, त्यांनी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना बेताल आरोप केल्याबाबत नोटिसा पाठवल्या आहेत.

भ्रष्टाचाराबाबतच्या प्रश्नावर राहुल गांधी यांनी सांगितले, की एचएएल कंपनी गेली ७० वर्षे विमाने तयार करीत आहे. त्यांच्यावर कुठले कर्ज नाही. काँग्रेस प्रणीत यूपीए सरकारने दसॉल्ट कंपनीशी राफेल विमानांचा करार करून त्याचे कंत्राट एचएएलला दिले होते. त्या वेळी एका विमानाची किंमत ५२० कोटी ठरली होती. मग अचानक काहीतरी झाले. पंतप्रधान मोदी फ्रान्सला गेले. त्यांनी १२६ विमानांऐवजी ३६ विमाने खरेदी करण्याचा करार केला. प्रत्येक विमानाची किंमत ५२० कोटीवरून १६०० कोटी केली. त्यात ही विमाने बनवण्याचे कंत्राट अनिल अंबानी यांना देण्यात आले. अनिल अंबानी यांच्यावर ४५००० कोटींचे कर्ज आहे. त्यांनी आयुष्यात विमान तयार केलेले नाही. तरी त्यांना राफेल विमाने तयार करण्याचे कंत्राट मिळाले. जगातील हे सर्वात मोठे संरक्षण कंत्राट होते.

रिलायन्स समूहाने सर्व आरोप फेटाळले असून, अनिल अंबानी यांनी राहुल गांधी यांना पत्र पाठवून त्यांच्या पक्षाला चुकीची माहिती मिळाली असून, हितसंबंधी लोक व कंपनीचे शत्रू काँग्रेसची दिशाभूल करीत असल्याचे म्हटले आहे.