पंतप्रधानांवर भ्रष्टाचाराचा राहुल यांचा आरोप; दिशाभूल करत असल्याचे भाजपचे प्रत्युत्तर

‘देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्ट आहेत. ‘राफेल’ विमानांचा खरेदी करार हा मोठा घोटाळा असून या प्रकरणात मोदींनी भ्रष्टाचार केला आहे,’ असा पहिल्यांदाच थेट आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. ‘राफेल’ कंत्राट देऊन मोदींनी ३० हजार कोटी अनिल अंबानीच्या खिशात घातलेले आहेत. या घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करण्याची मागणी केली असतानाही मोदींनी अवाक्षरही काढलेले नाही. भ्रष्टाचाराविरोधात संघर्ष करण्याच्या घोषणेवर मोदींनी जनतेची मते मागितली आता मात्र भ्रष्टाचाराच्या चौकशीपासून दूर पळू लागले आहेत, असा घणाघाती शाब्दिक हल्ला राहुल यांनी चढवला.

‘राफेल’ विमाने बनवणाऱ्या दासॉ कंपनीच्या दुसऱ्या क्रमांकाच्या कार्यकारी अधिकाऱ्याने कंपनीच्या बैठकीत अनिल अंबानी यांच्या ‘रिलायन्स’ कंपनीला देशी जोडीदार का बनवले याचे स्पष्टीकरण दिले असल्याचे वृत्त ‘मीडियापार्ट’ या फ्रेंच वृत्तसंकेतस्थळाने दिले आहे. भारताबरोबर ‘राफेल’चा करार करायचा असेल तर अनिल अंबानी यांना कंत्राट देणे ‘बंधनकारक’ असल्याचे या अधिकाऱ्याने कंपनीच्या अंतर्गत अहवालात नमूद केले आहे. या मुद्दय़ाचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले, ‘याअंतर्गत अहवालात ‘नुकसानभरपाई’ असा शब्द वापरण्यात आला आहे. अनिल अंबानी यांच्या कंपनीला कोणती नुकसानभरपाई आणि ती का द्यायची आहे? त्यातूनच संपूर्ण व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध होते! ‘राफेल’चे कंत्राट अनिल अंबानींना देण्याची अट घातली होती, ही बाब फ्रान्सचे माजी अध्यक्ष ओलांद यांनी यापूर्वीच उघड केली आहे.’

‘राफेल’संदर्भातील भारत आणि फ्रान्स यांच्यात झालेल्या करारानुसार दासॉ कंपनीला देशी जोडीदाराशी कंत्राट करून संयुक्तपणे विमान बनवण्याची प्रक्रिया पार पाडणे अपेक्षित आहे. त्यानुसार दासॉ कंपनीने संरक्षण उपकरणे बनवण्याचा कोणताही अनुभव नसलेल्या अनिल अंबानींच्या रिलायन्स कंपनीची निवड केली. दोन्ही देशांत करार होण्यापूर्वी फक्त बारा दिवस आधी अंबानींच्या कंपनीची नोंदणी झाली होती. त्यामुळे ‘रिलायन्स’च्या निवडीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. निव्वळ मोदी सरकारच्या दबावामुळे दासॉने ‘रिलायन्स’ला देशी जोडीदार बनवल्याचा आरोप काँग्रेस सातत्याने करत आहे.

भाजपची टीका

जे मुळातच मध्यस्थी करणाऱ्यांच्या कुटुंबातून येतात त्यांनी दुसऱ्यांवर आरोप करावेत हे हास्यास्पद आहे, असा टोला भाजप प्रवक्ते सांबित पात्रा यांनी  राहुल यांना लगावला आहे.

‘रिलायन्सला निवडण्याची मुभा’

पॅरिस : राफेल विमान सौद्यात भागीदार म्हणून रिलायन्स डिफेन्सला निवडण्याची मुभा आम्हाला होती, असे स्पष्टीकरण दासॉ एव्हिएशनने दिले आहे. फ्रान्सच्या माध्यमांत दासॉ एव्हिएशनवर रिलायन्स डिफेन्सला भागीदार म्हणून निवडण्यासाठी भाग पाडण्यात आले, असा दावा करण्यात आला होता. त्या पाश्र्वभूमीवर दासॉने हे स्पष्टीकरण दिले आहे. आमच्यावर संयुक्त भागीदारीसाठी कोणताही दबाव नव्हता, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

सीतारामन फ्रान्सला का गेल्या?

संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन फ्रान्सला गेल्या असून त्यांच्या या दौऱ्यावरही राहुल यांनी प्रश्नचिन्ह उभे केले. फ्रान्समध्ये अशी कोणती आणीबाणीची स्थिती निर्माण झाली की देशाच्या संरक्षणमंत्र्यांना तातडीने फ्रान्सला जावे लागले? त्यांना दासॉच्या कारखान्याला भेट द्यावी लागली आहे? सीतारामन यांचा दौरा फ्रान्सवर दबाव टाकण्यासाठी आयोजित केला आहे. ‘राफेल’ घोटाळ्यावर पडदा टाकण्याचा हा खटाटोप असल्याचा आरोप राहुल यांनी केला.

मोदी अनिल अंबानींचे ‘चौकीदार’ असून त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला पाहिजे. दासॉ कंपनीला मोदी सरकारकडून मोठे कंत्राट पदरात पाडून घ्यायचे आहे. त्यामुळे ही कंपनी भारत सरकारच्या मागण्या मान्य करणारच. देशी जोडीदार अनिल अंबानींनाच बनवायचे ही सक्ती मोदी सरकारने केली असल्याने दासॉ बरहुकूम वागणारच. आत्ता एका कंत्राटाचा भ्रष्टाचार उघड झाला आहे. अनेक कंत्राटे अनिल अंबानींना दिली गेली आहेत. अनिल अंबानी ४५ हजार कोटींच्या कर्जात बुडालेले आहेत, त्यांना मोदी सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.     – राहुल गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे खोटे बोलत असून, राष्ट्रीय सुरक्षेची थट्टा उडवत आहेत. २०१४ पूर्वी प्रत्येक संरक्षण सौद्यातून गांधी यांच्या कुटुंबीयांनी पैसे मिळवले असून, गांधी व त्यांच्या कुटुंबाने देशाची सुरक्षितता धोक्यात आणली आहे. राफेल कराराच्या मुद्दय़ावर दिशाभूल करून राजकीय कारकीर्द उभी करण्याची  राहुल यांची धडपड आहे.      -सांबित पात्रा, भाजप प्रवक्ते