कॉंग्रेस पक्ष अधिकाधिक पारदर्शक असल्याचे दाखविण्यासाठी पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नवा फंडा काढला आहे. कॉंग्रेसच्या पक्षरचनेत सर्वोच्चस्थानी असलेल्या कार्यकारी मंडळावरील पदाधिकाऱयांचीही यापुढे निवड होणार असून, अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे पदाधिकारीही निवडणुकीतूनच निवडले जाणार आहेत. पक्षामध्ये वरपासून खालपर्यंत सर्व समित्यांवर कोणत्याही व्यक्तीची नियुक्ती करायची नाही, सर्व ठिकाणी निवडणुकीतून सदस्यांची निवड करण्याची संधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना द्यायची, असे राहुल गांधी यांनी ठरविले आहे. कॉंग्रेसचे सरचिटणीस अजय माकन यांनी याबद्दल माहिती दिली.
राहुल गांधी यांनी याआधीच भारतीय युवक कॉंग्रेस आणि नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे पदाधिकारी निवडणुकीतूनच निवडण्यास सुरुवात केली होती. तिच पद्धत आता पक्षरचनेत सर्व ठिकाणी अमलात आणली जाणार आहे. पक्षांतर्गत सर्व पदाधिकारी हे नियुक्त न करता त्यांच्या निवडीसाठी निवडणूक घेण्याचे त्यांनी निश्चित केले.
लोकसभा निवडणुकीत देशातील १७ मतदारसंघांमध्ये पक्षाचा उमेदवार कोण असावा, हे कार्यकर्त्यांकडून जाणून घेऊन त्यावर उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. हाच फॉर्म्युला विधानसभा निवडणुकीतही काही मतदारसंघांमध्ये अमलात आणला जाईल, असे कॉंग्रेस पक्षातील सूत्रांनी सांगितले.
एकूणच पुढील निवडणुकीत कॉंग्रेसमधील उमेदवार निवडीची प्रक्रिया संपूर्णपणे वेगळी असणार आहे. राहुल गांधींना यामध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणायची आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी संस्कृती संपविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत, असेही सूत्रांनी सांगितले.