काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मास्कच्या निर्यातीवरुन हल्लाबोल केला. करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने व्हेंटिलेटर्स आणि सर्जिकल मास्कसारखी पुरेसी जीवरक्षक उपकरणं राखून का ठेवली नाहीत? असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच हा गुन्हेगारी कट तर नाही ना असा संशयही त्यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

याबाबतचा एक अहवाल शेअर करीत राहुल गांधी म्हणाले, “WHO ने तीन आठवड्यापूर्वीच व्हेंटिलेटर्स आणि सर्जिकल मास्कचा पुरेसा साठा करुन ठेवण्याच्या सूचना केलेल्या असतानाही तीन आठवड्यांनंतर केंद्र सरकारने या उपकरणांच्या निर्यातीवर बंदी घातली. जनतेच्या जीवाशी केलेला हा खेळ कोणत्या ताकदीच्या जोरावर करण्यात आला. हा गुन्हेगारी कट नाही का?”

WHO ने २७ फेब्रुवारी रोजी सर्व देशांसाठी काही मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध केली होती. यामध्ये म्हटलं होतं की, सध्या जगातील करोनाच्या प्रादुर्भावाची परिस्थिती पाहता मेडिकल मास्क आणि व्हेंटिलेटर्सची कमतरता आहे. त्याचबरोबर सर्जिकल गाऊन आणि गॉगल्सही लवकरच तुटवडा भासणार आहे. करोनाच्या रुग्णांमुळेच नाही तर या आजाराच्या भीतीमुळेही या गोष्टींची मागणी वाढू शकते. त्यामुळे जगभरात या वस्तूंची कमतरता भासू शकते, असं राहुल गांधी शेअर केलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

राहुल गांधीं पुढे म्हणतात, जेव्हा मोदींनी जनता कर्फ्युची घोषणा केली होती, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी केंद्र सरकारने मास्कच्या निर्यातीवर १९ मार्च रोजी बंदी घातली होती.