पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिटनेस व्हिडिओवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी टीका केली आहे. मोदींचा फिटनेस व्हिडिओ हा हास्यापद असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

बुधवारी दिल्लीत राहुल गांधी यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. या इफ्तार पार्टीत प्रणव मुखर्जी आणि प्रतिभाताई पाटील या माजी राष्ट्रपतींसह मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी, शरद यादव आदी नेतेमंडळी उपस्थित होती. इफ्तार पार्टी सुरु होताच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सीताराम येचुरी आणि अन्य मंडळींना मोदींचा व्हिडिओ बघितला का, असा प्रश्न विचारला. यावर त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर राहुल गांधींनीच त्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, तो व्हिडिओ हास्यास्पदच होता. खरंच तो व्हिडिओ विचित्रच वाटत होता. यानंतर राहुल गांधी यांनी येचुरी यांना आता तुम्ही पण फिटनेस व्हिडिओ पोस्ट केला पाहिजे, असे मस्करीत सांगितले.

दरम्यान, क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी फिटनेस चॅलेंज सुरु केले होते. त्यांनी विराट कोहलीला फिटनेस चॅलेंज दिले होते. विराट कोहलीने राज्यवर्धन सिंह राठोड यांनी दिलेलं चॅलेंज पूर्ण करत पत्नी अनुष्का शर्मा, महेंद्रसिंह धोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना फिटनेस चॅलेंज दिले होते. बुधवारी मोदींनी विराट कोहलीने दिलेले चॅलेंज पूर्ण करत स्वतःचा व्यायाम करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला.

पाहा: मोदींचा फिटनेस व्हिडिओ

नरेंद्र मोदी यांनी कुमारस्वामी आणि टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्रा यांना फिटनेस चॅलेंज दिले होते. मात्र, मात्र आपल्याला राज्याच्या फिटनेसची जास्त चिंता असल्याचं सांगत कुमारस्वामी यांनी मोदींचं चॅलेंज स्विकारण्यास नकार दिला आहे.