‘सर्व मोदी चोर आहेत’ असं विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी २०१९मध्ये एका प्रचारसभेत केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राहुल गांधींनी केलेल्या या विधानावर आक्षेप घेण्यात आला होता. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्यात आला होता. भाजपा आमदाराने दाखल केलेल्या या खटल्याप्रकरणी आज (२४ जून) राहुल गांधी यांनी न्यायालयात हजर राहून आपली भूमिका मांडली.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान एका प्रचारसभेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना मोदी आडनावावरून टोला लगावला होता. ‘सर्व मोदी चोर आहेत’ असं राहुल गांधी म्हणाले होते. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात आज झालेल्या सुनावणीला राहुल गांधी यांनी हजेरी लावली आणि न्यायालयासमोर आपलं म्हणणं मांडलं. “याबद्दल जास्त काही आठवत नाही, पण कोणत्याही समुदाय वा समाजासाठी हे म्हटलेलं नव्हतं. निवडणूक प्रचाराच्या काळात राजकीय टोमणा लगावला होता,” असं राहुल गांधी यांनी न्यायालयात सांगितलं.

हेही वाचा- राहुल गांधी गुजरात कोर्टात हजर; मोदींशी संबंधित आहे प्रकरण

दरम्यान, कॅमेरामॅनचा जबाब नोंदवण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली होती. ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. याप्रकरणी पुढील सुनावमी १२ जुलै रोजी होणार आहे. सूरत न्यायालयात हजर होण्यापूर्वी राहुल गांधी एक ट्विट केलं होतं. ज्यात म्हटलं होतं की, ‘अस्तित्वाचं रहस्य हेच आहे की, कोणत्याही प्रकारची भीती नसावी.”

अब्रुनुकसानीचा खटला कुणी दाखल केला? त्यांचं म्हणणं काय?

राहुल गांधी यांनी २०१९मध्ये केलेल्या या विधानावर आक्षेप घेत गुजरातमधील भाजपाचे आमदार पूर्णश मोदी यांनी अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात सारे मोदी चोर आहेत, असं म्हटलं असून, यातून समाजाचा अवमान केल्याचा आरोप त्यांनी याचिकेत केला होता. पूर्णेश मोदी यांची याचिका सूरत न्यायालयाने स्वीकारली होती. त्यानंतर राहुल गांधी यांना न्यायालयाने समन्स बजावले होते.