संघाच्या मानहानी प्रकरणातील खटला

महात्मा गांधी यांच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचे विधान केल्याच्या आरोपावरून दाखल असलेल्या मानहानीच्या खटल्यामध्ये मंगळवारी भिवंडी न्यायालयाने काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर आरोप निश्चित केले. मात्र हे आरोप मान्य नसल्याचे राहुल यांनी न्यायालयापुढे स्पष्ट केल्याने आता हा खटला चालविला जाणार आहे.

चार वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराकरिता राहुल गांधी हे भिवंडीत आले होते. या प्रचारसभेत महात्मा गांधी यांच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचे विधान केल्याचा आरोप भिवंडीतील संघाचे कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी केला होता. या प्रकरणी राजेश यांनी भिवंडी न्यायालयामध्ये राहुल यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. मंगळवारी सकाळी या खटल्याच्या सुनावणीसाठी राहुल हे भिवंडी न्यायालयात आले होते. त्यामुळे न्यायालय परिसरात सकाळपासूनच मोठा पोलीस फौजफाटा होता. या खटल्याची सुनावणी मुख्य दिवाणी न्यायाधीश ए. आय. शेख यांच्या न्यायालयात झाली. या सुनावणीदरम्यान मानहानी दाव्यामध्ये करण्यात आलेले आरोप न्यायालयाने राहुल यांच्यावर निश्चित केले. तसेच निश्चित केलेले आरोप मान्य आहेत का, असा प्रश्न न्यायाधीश शेख यांनी राहुल यांना विचारला. त्या वेळी हे आरोप मान्य नसल्याचे राहुल यांनी न्यायालयापुढे स्पष्ट केले. त्यामुळे या दाव्याचा खटला आता न्यायालयापुढे चालविला जाणार असून या खटल्याची पुढील सुनावणी १० ऑगस्टला होणार आहे.

आज देशासमोर शेतकरी, बेरोजगारी, महागाई यांसारखे गंभीर प्रश्न असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माझ्या खटल्याकडे लक्ष आहे. मात्र मी या खटल्याला घाबरत नाही. कारण ही माझ्या विचारांची लढाई आहे.  – राहुल गांधी