सहा महिन्यांनीच पुन्हा भेटा!
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या लहरी कामकाजाचा नवा अनुभव पक्ष खासदार व नेत्यांना येत आहे. राहुल गांधी यांना सहा महिन्यांमध्ये भेटले असल्यास लगेचच वेळ मिळणार नाही, असा नियमच आता त्यांच्या कार्यालयाने केला आहे.
राहुल गांधी यांच्या समर्थकांकडून फेब्रुवारीत राहुल यांच्या अध्यक्षपदाची घोषणा करण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे तगादा लावण्यात येत आहे. तर राहुलजी आम्हाला ओळखतदेखील नाहीत, अशी व्यथा खासदार, अनेक वरिष्ठ नेते सोनिया गांधींकडे व्यक्त करीत आहेत. आता तर राहुल गांधी यांनी सहा महिन्यांपूर्वी भेटलेल्यांना लगेचच भेटीसाठी वेळ न देण्याची सूचना आपल्या कार्यालयास केल्याने नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
राहुल गांधी फेब्रुवारीत अध्यक्ष होतील, अशी चर्चा दिल्लीत सुरू झाली आहे. तत्पूर्वी राहुल यांच्याशी चर्चा, संवाद, ओळख करून घेण्यासाठी अनेक खासदार, नेत्यांनी त्यांच्या कार्यालयाकडे वेळ मागितली. त्यावर ‘राहुलजींना शेवटी कधी भेटला होतात,’ असा प्रश्न कार्यालयाकडून विचारला जावू लागला आहे. ही भेट सहा महिन्यांमध्ये झाली असेल तर कार्यालयाकडून स्पष्टपणे भेटीसाठी नकार देण्यात येतो. सहा महिन्यांनंतरच दुसऱ्यांदा भेटीसाठी वेळ द्या, अशी राहुलजींची सूचना असल्याचे सांगण्यात येते. अत्यंत महत्त्वाचे काम असल्यास सोनिया गांधींच्या एखाद्या निकवर्तीयास सांगायचे. मग ते राहुलजींकडे निरोप देणार. त्यानंतर भेटीसाठी वेळ मिळणार, अशी कसरत सध्या काँग्रेस नेत्यांना करावी लागत आहे. राहुल गांधी सध्या उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल व केरळमधील नेत्यांच्या एकत्रित भेटी घेत आहेत. ज्यात किमान तीस ते चाळीस नेते असतात. तीन ते चार तास ही बैठक चालते. प्रत्येकाकडून ते मते जाणून घेतात. त्यावर या तीनही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीतील रणनीती ठरवण्यावर राहुल आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करतात. राहुल गांधी यांची ही रणनीती चांगली असली तरी, त्यांच्या सक्रियतेमुळे त्यांच्याशी फार परिचय नसलेल्या खासदार, पदाधिकाऱ्यांची कोंडी होत आहे, अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ नेत्याने दिली. सहा महिन्यांमध्ये अनेक कार्यक्रमांची आखणी करायची असते. त्यासाठी राहुल गांधी यांना भेटणे गरजेचे असते. सोनिया गांधी यांच्याकडे वेळ मागितली तर किमान दोन ते पाच मिनिटे तरी मिळत असत. तेवढय़ाने आमचे समधान होई. पण आता राहुल गांधी यांच्या कार्यालयातून सरळ नकार येतो. त्यानंतर मग कधी जयराम रमेश, प्रसारमाध्यम विभागाचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला, एससी विभागाचे प्रमुख के. राजू यांच्याकडे व्यथा मांडावी लागते.