काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या कैलास मानसरोवर यात्रेत आहेत. यावेळी राहुल गांधींनी आपल्यालाला आलेली अध्यात्मिक अनुभूती य़ेथील फोटोसह शेअर केली आहे. राहुल यांनी म्हटले, कोणीही व्यक्ती कैलासला तेव्हाच जाते जेव्हा त्याला तेथून निमंत्रण आलेले असते. मला ही संधी मिळाल्याने आणि या सुंदर यात्रेचा अनुभव घेण्यास मिळाल्याबद्दल मी खूपच खूष आहे. यावेळी मानसरोवराच्या दिव्यतेबद्दल सांगताना त्यांनी मोदी सरकारवरही निशाणा साधला आहे.

राहुल गांधींने लिहीले की, मानसरोवराचं पाणी खूपच शांत, स्थिर आणि कोमल आहे. हे सरोवर आपल्याला सर्वकाही देते मात्र, त्याबदल्यात आपल्याकडून काहीच घेत नाही. या सरोवराचे पाणी कोणीही ग्रहण करु शकतो. इथे कुठलाही द्वेष नाही. त्यामुळेच भारतात या पाण्याला पुजले जाते. या यात्रेत मी जे काही पाहिले ते तुमच्याशी शेअर करणार आहे.

दरम्यान, राहुल यांच्या कैलास मानसरोवरच्या यात्रेवरुन सध्या भाजपा आणि काँग्रेसमध्ये वादाला तोंड फुटले आहे. भाजपाने राहुल गांधींच्या या यात्रेला ढोंगीपण म्हटले आहे. तर भाजपाची ही टिपण्णी म्हणजे एक भिवभक्त आणि त्याच्या भक्तीमध्ये विघ्न असल्याचे संबोधले आहे. त्याचबरोबर या यात्रेदरम्यान, राहुल गांधींनी मांसाहार केल्याचा आरोप भाजपाने केला होता. मात्र, त्यानंतर काही वेळातच काठमांडू येथील हॉटेलने यावर स्पष्टीकरण देत राहुल गांधींनी येथे केवळ शाकाहारी जेवणच मागवल्याचे सांगितले.