21 September 2020

News Flash

राहुल गांधींनी शेतकऱ्यांची माफी मागायला हवी, काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची मागणी

पक्ष नेतृत्व निवडक लोकांनाच भेटत असल्याचे सांगत व्यक्त केली नाराजी

संग्रहीत

मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे दिग्गज नेते व माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या वादग्रस्त वक्तव्यांच्या सवयीबाबत सर्वांनाच माहिती आहे. मात्र आता त्यांचे बंधू मध्य प्रदेश काँग्रेसचे नेते व आमदार लक्ष्मण सिंह यांनी देखील असेच काहीसे खळबळजनक वक्तव्य केले आहे. ज्यामुळे मध्य प्रदेशमधील काँग्रेसच्या कमलनाथ सरकारला घरचा आहेर मिळाला आहे. राहुल गांधींनी शेतकऱ्यांची माफी मागायला हवी असे आमदार लक्ष्मण सिंह यांनी म्हटले आहे.

आपण शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देऊन सत्तेत आलो होतो. मात्र आपण अद्यापपर्यंत या आश्वासनाची पुर्तता करू शकलेलो नाही. कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या राज्यात मोठ्या प्रमाणात असल्याने कमलनाथ सरकारवर शेतकरी प्रचंड नाराज आहेत, असे लक्ष्मण सिंह यांनी म्हटले आहे.

यावेळी आपल्याच सरकारवर टीकास्त्र सोडत आमदार लक्ष्मण सिंह म्हणाले की, आपण शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची पुर्तता करण्यात अपयशी ठरलो आहोत. राहुल गांधींनी यासाठी शेतकऱ्यांची माफी मागायला हवी. निवडणुकीच्या काळात काँग्रेसकडून सांगण्यात आले होते की पक्ष सत्तेत आल्यावर दहा दिवसांत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल. त्यामुळे राहुल गांधींनी आपल्या आश्वासनाची पुर्तता करण्यात अपयशी ठरल्याबद्दल राज्यभरातील शेतकऱ्यांची माफी मागायला हवी. याचबरोबर त्यांनी हे देखील म्हटले की, शेतकऱ्यांची कर्जमाफी कधीपर्यंत केली जाईल हे देखील राहुल गांधींनी स्पष्ट करायला हवे, यामुळे काँग्रेस सरकारवर नाराज असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये योग्य संदेश जाईल.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आमदार लक्ष्मण सिंह म्हणाले की, केवळ दहा दिवसात ४५ हजार कोटींची कर्जमाफी करणे अशक्य होते. मात्र राहुल गांधींनी असे आश्वासन दिलेले होते म्हणुन मी म्हणालो की  आपण मान्य करायला हवी. आपण जर ही चुक झाकण्यासाठी आणखी काही आश्वासन दिली तर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात.

मागील वर्षी डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या येथील विधानसभा निवडणुकी अगोदर राहुल गांधी यांनी आश्वासन दिले होते की, जर मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकार सत्तेवर आले तर सरकार स्थापनेच्या दहा दिवसांच्या आतच शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले जाईल. आमदार लक्ष्मण सिंह यांनी म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत, शेतकरी प्रचंड चिडलेले आहेत. यावेळी त्यांनी हे देखील म्हटले की, पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व केवळ निवडक लोकांशीच भेटत आहे, हे पक्षासाठी घातक आहे. जर असेच सुरू राहिले तर पक्षाचे काय होईल, हे सांगू शकत नाही. पक्षाला बळकट करायचे असेल तर पक्ष नेतृत्वास सर्वांच्या संपर्कात रहावे लागेल, तेव्हा कुठे २०२४ मध्ये सत्तेत येता येईल. जर भाजपा अध्यक्ष अमित शाह आपल्या नेत्यांना भेटू शकतात तर मग सोनिया गांधी असे का करत नाहीत, अशी लोकं विचारणा करत असल्याचेही आमदार लक्ष्मण सिंह यांनी यावेळी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 5:31 pm

Web Title: rahul gandhi should apologise to the farmers msr 87
Next Stories
1 PNB case: नीरव मोदीच्या कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ
2 पत्नीनेच कापला हात, मुलाने उडवले शीर; सरकारी नोकरीसाठी निर्घृण हत्या
3 INX Media Case: चिदंबरम यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ
Just Now!
X