फेसबुक डेटा लीक प्रकरणात भाजपा आणि काँग्रेस यांच्यामध्ये अद्यापही एकमेकांवर टीकाटिप्पणीचा प्रकार सुरु आहे. कारण, बुधवारी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना म्हटले की, मार्क झुकेरबर्गने माफी मागितल्यानतंर आता राहुल गांधींनीही देशाची माफी मागावी.

फेसबुक डेटा लीक प्रकरणी फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी मंगळवारी अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी कँब्रिज अॅनालिटिका आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीमध्ये हस्तक्षेप केल्याची कबुली दिली.

बुधवारी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विट करुन राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, आता जेव्हा कॅब्रिंज अॅनालिटिकाने निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केल्याची बाब खरी असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच भारतातील निवडणुकांवर याचा काहीही परिणाम होणार नाही यासाठी प्रयत्न करणार असल्याचे फेसबुकनेही सांगितले आहे. याचप्रकारे आता राहुल गांधी यांनी देखील माफी मागायला हवी आणि वचन द्यायला हवे की ते भारतीय मतदारांची दिशाभूल करणार नाहीत तसेच समाजात फुट पाडण्याचे काम करणार नाहीत.

डेटा लीक प्रकरणावरून फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग हे सध्या जगभरात निशाण्यावर आहेत. दरम्यान, त्यांनी मंगळवारी अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये सिनेटसमोर हजेरी लावली. यावेळी त्यांनी डेटा लीकची जबाबदारी स्विकारत सिनेटची माफीही मागितली. ते म्हणाले, ही माझी चूक असून यासाठी मी माफी मागतो. मी फेसबुक सुरु केले आणि अजूनही मीच ते चालवतो आहे, त्यामुळे इथे जे काही होते त्यासाठी मीच जबाबदार आहे. त्याचबरोबर पुढील वर्षी भारतात होणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण हस्तक्षेप करणार नाही असे आश्वासनही त्याने दिले.

दरम्यान, कँब्रिज अॅनालिटिकाचा माजी कर्मचारी ख्रिस्तोफर विली याने ब्रिटनच्या हाऊस कॉमनमध्ये त्यांच्यासोबत काम केलेल्या जगभरातील राजकीय पक्षांची नावे सांगितली होती. यामध्ये भारतातील काँग्रेस पक्षाचे देखील नाव त्याने घेतले होते.